मनोहर कुंभेजकर, वेसावेवेसाव्यातील ७०० मच्छीमार बोटींसाठी सुसज्ज जेट्टी, दीपस्तंभ, बंदरावर बर्फ, मासे यांची ने-आण करण्यासाठी अप्ॉ्रोच रोड, शीतगृह यांचा अभाव आहे. वेसावे खाडीतील गाळ गेली अनेक वर्षे काढलेला नाही. मच्छीमारांना डिझेल परतावादेखील मिळालेला नसल्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. पण आता वेसावे जेट्टीला नवा लूक देण्यासाठी केंद्राकडून ४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय नौकायन मंत्री नितीन गडकरी यांनी वेसावे जेट्टीच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे ४० कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे वेसावा जेट्टीचा कायापालट होत असल्याची माहिती आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी दिली. गाळ काढण्यासाठी नियोजन मंडळाच्या बैठकीत मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ३.७५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. याहून अधिक निधीची मागणी त्यांनी उपनगराचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. आवश्यकता असल्यास जादा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन तावडेंनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
वेसावे जेट्टीला मिळणार नवा लूक
By admin | Published: June 29, 2015 3:09 AM