Join us

सरकारवर केली टीका, भर कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 8:24 AM

सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देअमोल पालेकरांनी सरकारच्या निर्णयावर केली टीकाभर कार्यक्रमात पालेकरांचं भाषण रोखण्यात आलेसोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

मुंबई - सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (9 फेब्रुवारी) एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना आपले मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले. इतकंच नाही तर भाषण लवकर संपवण्यासही सांगितले.  

शनिवारी अमोल पालेकर 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट'द्वारे आयोजित कार्यक्रमास संबोधित करत होते. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणादरम्यान पालेकर म्हणाले की, कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावलंय. शिवाय, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

यादरम्यान, पालेकरांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले. 

सरकारच्या या निर्णयाविरोधात पालेकरांनी आपले परखड मत मांडण्यास सुरुवात करताच, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मॉडरेटरनं त्यांना रोखण्यास सुरुवात केली. मॉडरेटरकडून भाषणात वारंवार अडथळे आणले जात असल्याने अखेर पालेकरांनी त्यांना विचारले की, माझे भाषण मी अर्ध्यातच थांबवावे अशी तुमची इच्छा आहे का?. यावर मॉडरेटरनं पालेकरांना हा कार्यक्रम प्रभाकर बर्वे यांच्यासाठी असून त्यांच्याबद्दलच बोलावे असे म्हणत त्यांना आपले भाषण लवकर संपवण्यास सांगितले.

दरम्यान, या प्रकारामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सकडून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

(चांगल्या-वाईटाचा स्वीकार करणारी सहिष्णुता हवी, अमोल पालेकर यांचा सल्ला)

 

टॅग्स :अमोल पालेकरकेंद्र सरकारनरेंद्र मोदी