ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान; CM एकनाथ शिंदेंनी केला सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:19 PM2024-02-22T23:19:20+5:302024-02-22T23:20:27+5:30
Maharashtra Bhushan To Ashok Saraf: एका भव्य सोहळ्यात अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Maharashtra Bhushan To Ashok Saraf: राज्य शासनाकडून दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वरळी येथील डोम नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, मनिषा कायंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमात मानाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला. 'राज कपूर जीवनगौरव' ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना प्रदान करण्यात आला. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांना प्रदान करण्यात आला.
सन २०२० चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना प्रदान करण्यात आला. सन २०२१ चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी किरण शांताराम उपस्थित होते. सन २०२२ चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला.
सन २०२० 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव' (मरणोत्तर) स्व. रवींद्र महाजनी यांना जाहीर झाला होता. अभिनेते आणि रवींद्र महाजनी यांचे पुत्र गश्मीर महाजनी यांनी स्वीकारला. सन २०२२ 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव' ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना प्रदान करण्यात आला.
सन २०२० चा'राज कपूर जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना प्रदान करण्यात आला. सन २०२१ चा'राज कपूर जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आला होता. मिथुन चक्रवर्ती उपस्थित नसल्यामुळे त्यांचे स्नेही विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.