ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 10:40 PM2017-08-02T22:40:32+5:302017-08-02T22:43:34+5:30
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारांसाठी आज दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले
मुंबई, दि. 2 - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारांसाठी आज दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून, उद्या चाचण्याचे अहवाल मिळणार आहेत. दिलीप कुमार हे 94 वर्षांचे असून, वार्धक्यामुळे आलेल्या आजारपणांमुळे त्यांची प्रकृती वारंवार बिघडत असते. याआधी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ताप आणि पायाला आलेली सूज या तक्रारीमुळे लीलावती मध्ये ऍडमिट करण्यात आले होते.
दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पेशावर (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येऊ लागले होते. १९३०च्या दरम्यान लाला गुलाम सरवर हे आपल्या पत्नीसह सात मुलांना घेऊन मुंबईत स्थायिक झाले. बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार हे बालपणापासून मित्र होते. या दोघांचेही कुटुंब पेशावर येथे राहणारे होते. या दोघांच्याही कुटुंबांमध्येही जवळचे संबंध होते. राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर हे सर्वात आधी मुंबईला आले होते. त्यानंतर दिलीप कुमार यांचे वडील लाला गुलाम सरवर हे आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईला आले.
ट्रॅजेडी किंग ही उपाधी लागलेल्या दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला ज्वार भाटा (१९४४) पासून सुरुवात केली. अंदाज (१९४९), दीदार (१९५१), आन (१९५२), देवदास (१९५५), मुगल-ए-आझम (१९६०), गंगा जमना (१९६१), मधुमती (१९५८), राम और श्याम (१९६७), आदमी (१९६८), गोपी (१९७०), बैराग (१९७६), शक्ती (१९८२) यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट. अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी आठ वेळा पटकावला आहे. केंद्र सरकारने १९९४ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकीर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार बहाल केला.
अभिनेता दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाते. रुपेरी पडद्यावर दु:खी व्यक्तिरेखा साकारणा-या दिलीप यांच्या खासगी आयुष्यातील ट्रॅजेडी फार कमी जणांना माहित आहेत. दिलीप कुमार जेव्हा चित्रपटसृष्टीतही आले नव्हते तेव्हा त्यांना लोक युसुफ खान या नावानेच ओळखत होते.