ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:06 AM2021-04-21T04:06:41+5:302021-04-21T04:06:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी नाटक व चित्रपटांसह मालिका तसेच हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी नाटक व चित्रपटांसह मालिका तसेच हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवारी ठाणे येथील रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ठाण्याच्या ग्लोबल रुग्णालयात कोरोनावरील उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तीन पुत्र व त्यांचा परिवार आहे.
किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा वडिलांकडून लाभला होता. आंतरगिरणी आणि कामगार नाट्यस्पर्धेचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. नोकरी सांभाळत ते नाटकात काम करत असत. परळच्या भोईवाड्यात नांदलस्कर यांनी त्यांचे बरेचसे आयुष्य व्यतीत केले. कालांतराने कलावंतांसाठी असलेल्या कोट्यातून त्यांना बोरिवली येथे सदनिका मिळाली. या ठिकाणी ते एकटेच राहायचे. स्वतःहूनच त्यांनी एकांतवास स्वीकारला होता. नांदलस्कर यांनी अनेक मराठी नाटके, मराठी व हिंदी चित्रपट तसेच विविध मालिकांमध्ये अभिनयाची छाप पाडली. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक जेव्हा नव्याने रंगभूमीवर आले, तेव्हा त्यातले ‘राजा’ हे पात्र त्यांनी साकारले होते. ‘वासूची सासू’ या नाटकातही त्यांनी धमाल उडवली होती. ‘पाहुणा’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’, ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी भूमिका रंगवल्या. विनोदाचे अफलातून टायमिंग हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य होते.
किशोर नांदलस्कर यांनी १९८९ मध्ये ‘इना मीना डिका’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ‘शेजारी शेजारी’, ‘कुठे कुठे शोधू मी तुला’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘शेम टू शेम’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘लपंडाव’, ‘गृहप्रवेश’, ‘सारेच सज्जन’, ‘करामती कोट’, ‘अक्का’, ‘विश्वनायक’, ‘जन्मदाता’, ‘बजरंगाची कमाल’, ‘पैज लग्नाची’, ‘जमलं हो जमलं’, ‘रंग प्रेमाचा’, ‘धांगडधिंगा’, ‘लालबागचा राजा’, ‘तहान’, ‘सून माझी भाग्याची’, ‘कलंक’, ‘नशिबाची ऐशीतैशी’, ‘लोणावळा बायपास’, ‘काळसेकर आहेत का?’, ‘लादेन आला रे आला’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
१९९९ मध्ये पडद्यावर आलेल्या ‘वास्तव’ या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. ‘चांदनी’, ‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘कुरुक्षेत्र’, ‘अस्तित्व’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘एहसास’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘हाऊसफुल’, ‘खाकी’, ‘मुन्नाभाई एसएससी’, ‘सनम हम आपके हैं’ आदी हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत त्यांनी बॉलिवूडमध्ये मराठी पाऊल दमदारपणे ठसवले. नांदलस्कर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी पडदा आणि दूरचित्रवाणी अशा माध्यमात बहुमोल योगदान देणारा कलावंत हरपला असल्याची भावना या क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------