मुंबई / ठाणे : मराठी नाटक व चित्रपटांसह मालिका तसेच हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवारी ठाणे येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ठाण्याच्या ग्लोबल रुग्णालयात कोरोनावरील उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा वडिलांकडून लाभला होता. किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईचाच. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी, तसेच कामगार नाट्यस्पर्धेतही नाटक बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. कालांतराने कलावंतांसाठी असलेल्या कोट्यातून त्यांना बोरिवली येथे सदनिका मिळाली. काही वर्षांपूर्वी मुलासोबत ठाण्यात राहायला आले होते. महेश मांजरेकर यांच्या सर्व चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. १९६२ या वेबसिरीजमध्येदेखील त्यांनी भूमिका साकारली. मांजरेकर यांच्यासोबत शेवटचा चित्रपट त्यांनी केला. तो अजून प्रदर्शित झालेला नाही.
अल्प परिचय
नांदलस्कर यांनी आतापर्यंत सुमारे ४० हून अधिक नाटके, १००हून अधिक मराठी व हिंदी चित्रपट आणि २०हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक जेव्हा नव्याने रंगभूमीवर आले, तेव्हा त्यातले ‘राजा’ हे पात्र त्यांनी साकारले होते. ‘वासूची सासू’ या नाटकातही त्यांनी धमाल उडवली होती. ‘पाहुणा’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’, ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी भूमिका रंगवल्या. किशोर नांदलस्कर यांनी १९८९मध्ये ‘इना मीना डिका’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ‘शेजारी शेजारी’, ‘कुठे कुठे शोधू मी तुला’ ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘लपंडाव’, ‘गृहप्रवेश’, ‘सारेच सज्जन’, ‘करामती कोट’, ‘अक्का’, ‘विश्वनायक’, ‘जन्मदाता’, ‘बजरंगाची कमाल’, ‘पैज लग्नाची’, ‘जमलं हो जमलं’, ‘रंग प्रेमाचा’, ‘धांगडधिंगा’, ‘लालबागचा राजा’,‘काळसेकर आहेत का?’, ‘लादेन आला रे आला’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
१९९९मध्ये पडद्यावर आलेल्या ‘वास्तव’ या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. ‘चांदनी’, ‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘कुरुक्षेत्र’, ‘अस्तित्व’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘एहसास’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘हाऊसफुल’, ‘खाकी’, ‘मुन्नाभाई एसएससी’, ‘सनम हम आपके हैं’ आदी हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत त्यांनी बॉलिवूडमध्ये मराठी पाऊल दमदारपणे ठसवले.
प्रतिक्रिया :
किशोर नांदलस्कर यांच्या खूप आठवणी आहेत. ते विनोदी नट असले तरी आतून खूप गंभीर असत. ते एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते. ओढूनताणून त्यांनी विनोदी भूमिका केल्या नाहीत.
- जयवंत वाडकर, अभिनेता
मी २०१४ साली एक सिनेमा केला होता. ज्यात नांदलस्कर यांनी काम केले होते. त्या सिनेमात मी एक गाणे केले होते. ते गाणे चित्रित होत असताना रमेश देव, सीमा देव, उदय सबनीस, विजू खोटे, स्वतः नांदलस्कर सगळी मंडळी नृत्य एन्जॉय करत होती. एका ब्रेकमध्ये किशोर नांदलस्कर मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले, ‘रमेश देवांचं वय किती असेल रे?’ मी म्हटलं ‘असेल ८० वगैरे.’ मग त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, ‘मी ८० वर्षांचा होईन तेव्हा माझ्यासाठी असे एखादे गाणे करशील, असं मला वचन दे?’ आणि त्यांचे ते भरून आलेले डोळे अजूनही आठवतायत.
- विजू माने, दिगदर्शक
फोटो आहे - २०किशोर नांदलस्कर