मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी टॉम अल्टर यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. मात्र, यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. टॉम अल्टर यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
टॉम अल्टर यांनी 1976 मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस : द अनफरगॉटन हिरो आणि वीर झारा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. मात्र जबान संभालके (1993-1997) या शो (सिटकॉम) नंतर ते बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी 300हून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला. तसेच, अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. नव्वदच्या दशकात दूरदर्शनवरील जुनून या मालिकेत त्यांनी साकारलेली गॅंगस्टर केशव कलसीची भूमिका बरीच गाजली होती. याचबरोबर, जुगलबंदी, भारत एक खोज, घुटन, शक्तीमान, मेरे घर आणा जिंदगी, यहॉं के हम सिकंदर यासारख्या मालिकामधूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.
1980 ते 90 च्या कालावधीत टॉम अल्टर यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी त्याची मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते. याचबरोबर, टॉम अल्टर यांनी तीन पुस्तकेही लिहिली आहेत. तसेच, चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 2008 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.