लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: रंगभूमीवर मराठी आणि हिंदी नाटकांसोबत इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केलेले अभिनेते राजा बापट (८४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायकांळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
माहीममध्ये वास्तव्यास असलेल्या राजा बापट यांनी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजरपदावर काम केले होते. बँकेतील नोकरी सांभाळून त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला. रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्यामध्ये त्यांनी सुरेश खरे यांच्यासोबत अभिनय केला. सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकताना एकांकिका व नाटकांमध्ये काम करताकरता त्यांनी पुढे ललित कला साधना या संस्थेच्या ‘सागर माझा प्राण’ या नाटकात नायकाची भूमिका साकारली. याखेरीज ‘एकटी’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. राजा ठाकूर यांच्या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला.
मालिकांमध्येही काम
बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राजा बापट यांनी मराठी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. अलिकडच्या काळापर्यंत त्यांनी मालिकांमध्ये काम केले आहे. राजा सुरेख हार्मोनियम वाजवायचे. त्यांना भारतीय क्लासिकल संगीताचा कान होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"