मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी गावदेवीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ३०० हून अधिक मराठी-हिंदी भूमिका त्यांनी साकारल्या. शोले, अंदाज अपना अपना, अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या.गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती फारशी चांगली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानं एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला.
Viju Khote Death : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे कालवश; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 8:06 AM