ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:51+5:302021-04-05T04:06:51+5:30
मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचे रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ...
मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचे रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शशिकला यांनी १०० हून अधिक चित्रपटांत काम केले. हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात म्हणजेच सत्तरच्या दशकात त्यांची कारकीर्द अधिक बहरली. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेली खलनायिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.
४ ऑगस्ट, १९३२ रोजी सोलापुरातील एका सुखवस्तू कुटुंबात शशिकला यांचा जन्म झाला. त्यांना सहा भावंडे होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी नृत्य, गायन व अभिनयास सुरुवात केली. पुढे वडिलांना व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्यांचे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले.
मुंबईत त्यांची गाठ नूरजहाँ यांच्याशी पडली. नूरजहाँ यांनी त्यांना ‘झीनत’ या शौकत रिझवी यांच्या चित्रपटात काम मिळवून दिले. शशिकला यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्माते पी.एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती आणि व्ही.शांताराम यांचे लक्ष वेधून घेतले. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना ‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिले. २०व्या वर्षी ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.
बॉलीवूडमधील अनेक नावाजलेले निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. ‘नौ दो ग्यारह’, ‘कानून’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
‘जागा भाड्याने देणे आहे’, ‘पठ्ठे बापुराव’, ‘चाळीतील शेजारी’, ‘येरे माझ्या मागल्या’, ‘झालं गेलं विसरून जा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘सलामी’, ‘महानंदा’, ‘लेक चालली सासरला’, ‘धाकटी सून’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या.
२००७ साली भारत सरकारने शशिकला यांचा सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान केला. २००९ साली त्यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
..................