ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:06 AM2021-07-17T04:06:20+5:302021-07-17T04:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सहजसुंदर अभिनयाने मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील भूमिका उठावदार करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सहजसुंदर अभिनयाने मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील भूमिका उठावदार करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा आहे. ‘बालिका वधू’मधील दादीसा आणि ‘बधाई हो’मधील आजी या त्यांच्या अलीकडच्या काळातील गाजलेल्या भूमिका.
सन १९७८ मध्ये ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या प्रांतात प्रवेश केला. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिकांमधून त्यांनी भरपूर काम केले. ‘तमस’, ‘मम्मो’ आणि ‘बधाई हो’ या सिनेमांतील अभिनयाबद्दल त्यांना तीन वेळा सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हिंदी नाट्यसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल यांना संगीत नाटक अकादमीने १९८९ मध्ये सन्मानित केले होते.
सिक्री यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्यांचे बालपण अलमोरा आणि नैनिताल येथे गेले. त्यांचे वडील हवाई दलात होते, तर आई शिक्षिका. १९७१ मध्ये सिक्री यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेतली. दहा वर्षे दिल्लीत काम केल्यावर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय होते, अशी माहिती सिक्री यांच्या व्यवस्थापकाने दिली.
.....................
श्रद्धांजली
सुरेखा या नाट्य क्षेत्रातील प्रथितयश अभिनेत्री होत्या. त्यांचे दिल्लीतील नाट्यप्रयोग मी पाहिले आहेत. तिथेच आमची ओळख झाली. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’, ‘झुबेदा’ या तीन सिनेमांत त्यांनी माझ्यासह काम केले. त्या प्रतिभासंपन्न होत्या. कोणतीही भूमिका त्या लीलया साकारत असत.
- श्याम बेनेगल, ज्येष्ठ दिग्दर्शक
सुरेखा यांचा माझा परिचय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासूनचा होता. अलीकडे ‘बधाई हो’ या सिनेमापूर्वी मी त्यांच्यासोबत ‘सात फेरे -सलोनी का सफर’ या मालिकेत काम केले. त्यांच्या काम करण्याच्या शैलीतून मी खूप काही शिकले.
- नीना गुप्ता, अभिनेत्री