महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेतेही लोकसभेच्या रिंगणात ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 09:29 AM2023-09-30T09:29:53+5:302023-09-30T09:30:43+5:30
मध्यप्रदेशच्या धर्तीवर चर्चेला उधाण, ६ ते ७ आमदारांना मिळू शकतो पक्षादेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात सध्या आमदार असलेल्या सहा-सात जणांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. मध्य प्रदेशबाबत भाजप श्रेष्ठींनी घेतलेल्या भूमिकेमुळे या चर्चेला बळ मिळाले आहे.
मध्यप्रदेश विधानसभेच्या लवकरच होणाऱ्या निवडणुकीत तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना उमेदवारी देऊन भाजपने मोठी खेळी खेळली आहे. मध्य प्रदेशमधील सत्ता टिकविण्याचे मुख्य लक्ष्य पक्षासमोर आहे. कारण, विधानसभेतील यशावर लोकसभेतील यश अवलंबून असेल. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही विधानसभेच्या आखाड्यात उतरविले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मध्य प्रदेशच्या उलटे आहे. आपल्याकडे आधी लोकसभा व नंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळेच आमदार असलेल्या वजनदार नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची रणनीती आखली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
यांना मिळू शकते लोकसभेचे तिकीट
महाराष्ट्रातील ज्या आमदारांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते त्यात मंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), मंत्री गिरीश महाजन (रावेर), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (वर्धा), आकाश फुंडकर (अकोला), राम सातपुते (सोलापूर), मंत्री रवींद्र चव्हाण किंवा आ. संजय केळकर (ठाणे), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (दक्षिण मुंबई) यांच्या नावांची चर्चा आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाऊ शकते.
शिंदे-अजित पवार गटालाही आग्रह
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने त्यांच्या वाट्याच्या जागांवर उमेदवार देताना पक्षाचे दिग्गज मंत्री वा आमदारांना संधी द्यावी, असा आग्रह भाजपकडून केला जाऊ शकतो.
या दोन मित्रपक्षांच्या सध्याच्या खासदारांच्या मतदारसंघातही भाजपने सर्वेक्षण केले असून, त्याबाबतची माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांना देण्यात आली आहे असेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
जिंकून येण्याची क्षमता हाच निकष
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार जिंकणे हे तीनशेचा देशपातळीवर आकडा गाठण्यासाठी भाजपला आवश्यक आहे. त्यामुळे जिंकून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर उमेदवारी दिली जाईल, असे म्हटले जाते. खासदारकी लढण्याकडे बहुतेक आमदारांचा कल नसतो. राज्यात आज ना उद्या मंत्री होता येईल या आशेने ते आमदारकीलाच पसंती देतात. मात्र, यावेळी पक्षादेशानुसार काहींना लोकसभेची तयारी करावी लागू शकते
प्रचाराची सूत्रे फडणवीसांकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मतदारसंघातून लढणार, देवेंद्र फडणवीस यांना उत्तर-पूर्व मुंबईतून भाजप रिंगणात उतरविणार, अशा काही चर्चांना गेले काही दिवस राज्यातील राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा यापूर्वीही रंगली होती. तथापि आपण राज्यातच समाधानी असून, इथेच राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. प्रचाराची सूत्रे मुख्यत्वे फडणवीस यांच्याकडे असतील, त्यामुळे त्यांना लोकसभेच्या उमेदवारीत गुंतवून ठेवले जाणार नाही असे मानले जाते.