Join us  

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 9:32 AM

Manik Bhide: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (८८) यांचे दादर शिवाजी पार्कजवळील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून त्या पार्किन्सन या आजाराने ग्रस्त होत्या.

मुंबई  - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (८८) यांचे दादर शिवाजी पार्कजवळील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून त्या पार्किन्सन या आजाराने ग्रस्त होत्या. त्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, मुलगी गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१५ मे १९३५ रोजी कोल्हापुरात माणिक गोविंद भिडे यांचा जन्म झाला होता. बालपणापासून संगीताची असलेली आवड व आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे लहानवयातच त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. जयपूर-अत्रोली घराण्याच्या तालमीत तयार झालेले गुरू मधुकरराव सडोलीकर यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. बीएची पदवी घेईपर्यंत त्यांनी सडोलीकरांच्याच मार्गदर्शनाखाली संगीत साधना केली. पुढे गोविंद भिडेंशी विवाह झाल्यानंतर मुंबईत आलेल्या माणिक यांनी किशोरी आमोणकर यांच्या सान्निध्यात संगीताची आराधना सुरू केली. 

त्याचा फायदा त्यांना संगीतक्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी झाला. मुलगी अश्विनीसोबतच त्यांनी माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, गीतीका वर्दे, संपदा विपट, ज्योती काळे अशी बरीच संगीत क्षेत्रातील नामवंत शिष्य मंडळी घडविण्याचे काम केले. आकाशवाणी आणि माणिक यांचे एक अनोखे नाते होते. 

टॅग्स :मुंबई