लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते डॉ. माईक बाबुराव पवार (वय ७४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील हडपसर भागात त्यांचे वास्तव्य होते.
ख्यातनाम दिग्दर्शक, निर्माते आणि कथालेखक म्हणून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत परिचित होते. ‘श्रद्धा’ आणि ‘धडाका’ हे दोन मराठी चित्रपट, तर ‘हमे जीने दो’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.
‘श्रद्धा’ चित्रपटात अरुण सरनाईक, अशोक सराफ, कानन कौशल यांच्यासोबत त्यांनीही काम केले. १९९० साली हडपसरच्या वेशीवर त्यांनी ‘धडाका’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. यात शम्मी कपूर, राज कपूर, अशोक सराफ, जॉनी लिव्हर यांच्या भूमिका होत्या. तर असराणी, जगदीप यांना घेऊन त्यांनी ‘हमे जिने दो’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. अखिल महाराष्ट्र वैदू समाज या संघटनेचे माईक पवार हे पहिले अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी वैदू समाजाच्या विकासासाठी काम केले.