‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 07:20 AM2022-01-22T07:20:15+5:302022-01-22T07:22:34+5:30
ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा, मुलगी शेफाली, मुलगा आशिष आणि जावई आनंद मोहन असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी, सकाळी त्यांचे पार्थिव वांद्रे (पूर्व) येथील निवासस्थानी आणण्यात आले. लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रायकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यावेळी रायकर कुटुंबीयांचेही सांत्वन केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रायकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
रायकर यांना डेंग्यू व कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, पहाटे त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यातच तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
रायकर यांची पाच दशकांची समृद्ध पत्रकारितेची कारकिर्द होती. त्यांनी १९६३मध्ये नागपूर येथे पत्रकारितेस सुरुवात केली. १९७०मध्ये ते मुंबईत ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये दाखल झाले. १९९४मध्ये ते लोकसत्ता दैनिकात रुजू झाले. तेथून ते २००२ मध्ये निवृत्त झाले. २००२मध्येच त्यांनी ‘लोकमत’ माध्यमसमूहात प्रवेश केला. प्रथम औरंगाबादचे संपादकपद, पाठोपाठ मुंबईचे संपादकपदही त्यांनी भूषविले. २००९मध्ये त्यांच्याकडे ‘लोकमत’च्या समूह संपादक पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. ती त्यांनी २०१९पर्यंत समर्थपणे पार पाडली. नंतर ते सल्लागार संपादकपदी होते.
दांडगा जनसंपर्क, विषयांची जाण, सोपी मांडणी यांमुळे त्यांचे लिखाण वाचनीय असे. पत्रकारांच्या प्रश्नांवरही ते सजग असत. मुंबई प्रेस क्लब तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. राज्य सरकारने त्यांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारा’ने सन्मानित केले होते. तसेच, ‘लोकमत’ समूहाच्या जीवनगौरव पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.