Join us

मुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते, सिनेकलाकारांनी घेतले अंतिम दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सदाबहार अभिनयाने गेली अनेक दशके सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीपकुमार यांचे अंतिम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सदाबहार अभिनयाने गेली अनेक दशके सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि सिनेकलाकारांचा समावेश होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दिलीपकुमार यांच्या पाली हिल येथील निवासस्थानी दाखल झाले. या वेळी त्यांच्या समवेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सायरा बानो यांचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री नवाब मलिक, छगन भुजबळ हे दिलीपकुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले. पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, अमिन पटेल, बाबा सिद्दिकी यांनीही अंत्यदर्शन घेत सायरा बानो यांचे सांत्वन केले.

दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून अनेक सिनेकलाकारांची रीघ लागली होती. धर्मेंद्र, सुभाष घई, अनुपम खेर, शबाना आझमी, अनिल कपूर, रझा मुराद, शक्ती कपूर, शाहरूख खान, गौरी खान, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, करण जोहर, रणबीर कपूर, जॉनी लिवर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार दिलीपकुमार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दाखल झाले.

..............

शाहरूख खान येताच सायरा बानो झाल्या भावुक

शाहरूख खान नियमितपणे दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी जात. सायरा बानो यांचीही ते आईप्रमाणे काळजी घेतात. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बुधवारी शाहरूख खान अंत्यदर्शनासाठी दाखल होताच सायरा बानो यांच्या अश्रूंचा बांध फुटला. शाहरूखच्या खांद्यावर डोके ठेवून त्यांनी आपल्या आसवांना मोकळी वाट करून दिली. त्यांच्या हुंदक्यांमुळे शाहरूखलाही अश्रू अनावर झाले.