Join us

ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:07 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चाळीसहून अधिक वर्षे लोकसंगीतासह नाट्य, चित्रपट व संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे ज्येष्ठ संगीतकार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चाळीसहून अधिक वर्षे लोकसंगीतासह नाट्य, चित्रपट व संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक अच्युत ठाकूर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या वीस दिवसांपासून कोरोनावरील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

‘जांभूळ आख्यान’, ‘तीन पैशांचा तमाशा’ अशी गाजलेली नाटके; तसेच ‘चिमणी पाखरं’, ‘घे भरारी’, ‘गृहलक्ष्मी’, ‘सर्जा राजा’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. रवींद्र साठे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, आशा खाडिलकर, देवकी पंडित, फय्याज आदी नामवंत गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत.

अच्युत ठाकूर यांनी लोकसंगीतातही भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, काश्मीर, आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल आदी राज्यांत जाऊनही त्यांनी लोकसंगीताचे कार्यक्रम केले. युवक बिरादरी, इंडियन नॅशनल थिएटर या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी देशभर विविध कार्यक्रम सादर केले आहेत. युवावस्थेत असतानाच ते लोककलेकडे आकर्षित झाले होते. विश्वनाथ मोरे यांच्या संपर्कात आल्यावर त्यांना लोकसंगीतात अधिक रुची वाटायला लागली.

पं. शिवरामबुवा वरळीकर, पं. प्रभाकर म्हात्रे, पं. यशवंतबुवा जोशी आदी श्रेष्ठ गुरूंच्या हाताखाली त्यांनी संगीताचे धडे गिरविले. गांधर्व महाविद्यालयातून ते संगीत विशारद झाले होते. ‘श्री रामायण’ या सन १९८३ मध्ये झळकलेल्या मराठी चित्रपटाद्वारे त्यांचे संगीतकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून जबाबदारी पार पाडली. मात्र ‘जांभूळ आख्यान’ या रंगभूमीवर आलेल्या नाटकाने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. या नाटकाचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले होते.

केंद्र शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित महासंगीताच्या स्पर्धेत ‘आयएनटी’च्या संचासोबत अच्युत ठाकूर यांना पाठविण्यात आले होते. तीस देशांच्या या स्पर्धेत भारताला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात शाहीर विठ्ठल उमप यांच्यासह अच्युत ठाकूर यांचाही मोठा वाटा होता.

प्राप्त पुरस्कार :

-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे उत्कृष्ट संगीतकार म्हणून गौरव

-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार

- मुंबई महानगरपालिकेचा उत्कृष्ट संगीत शिक्षक म्हणून महापौर पुरस्कार

- रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार

- ‘महाभारत’ या नाटकासाठी राज्य पुरस्कार

- ‘पैज लग्नाची’ या चित्रपटासाठी गायक व संगीतकार म्हणून एकाच वेळी राज्य पुरस्कार

-------------------------------------------------------------------------------------------------------------