ज्येष्ठ रंगकर्मी आनंदा नांदोसकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:06 AM2021-01-04T04:06:39+5:302021-01-04T04:06:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती अशा क्षेत्रांत अमूल्य योगदान देत रंगभूमीवर आपली विशिष्ट छाप पाडणारे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती अशा क्षेत्रांत अमूल्य योगदान देत रंगभूमीवर आपली विशिष्ट छाप पाडणारे ज्येष्ठ रंगकर्मी आनंदा नांदोसकर यांचे शनिवारी रात्री अंधेरी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ७९ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
आनंदा नांदोसकर यांनी जवळपास चाळीस वर्षे रंगभूमीवर योगदान दिले. ‘भटाला दिली ओसरी’, ‘जमलं बुवा एकदाचं’ अशा गाजलेल्या नाटकांपासून अलीकडच्या ‘नात्यातून गोत्यात’ या नाटकापर्यंत त्यांनी त्यांच्या कलागुणांची छाप पाडत स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला. रिझर्व्ह बँकेत नोकरी करत असतानाच त्यांनी नाट्यक्षेत्रात उडी घेतली. ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे हे त्यांना गुरुस्थानी होते. ‘सायलेन्स खटला चालू हाय’ या एकांकिकेने त्यांना हौशी रंगभूमीवर प्रसिद्धी मिळवून दिली. फार्ससम्राट बबन प्रभू यांच्या पश्चात आत्माराम भेंडे यांनी आनंदा नांदोसकर यांना अनेक नाटकांत भूमिका दिल्या. विविध प्रकारच्या भूमिका साकारत आनंदा नांदोसकर यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही आपले नाणे खणखणीत वाजवले. ‘ठकास महाठक’, ‘छक्के पंजे’ अशा काही मराठी चित्रपटांतही त्यांनी भूमिका रंगवल्या होत्या. त्यांच्या निधनाने मागच्या पिढीतील एक अनुभवी रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त होत आहे.