ज्येष्ठ चित्रकार कवी षांताराम पवार यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 05:09 AM2018-08-10T05:09:22+5:302018-08-10T05:09:32+5:30
‘...आणि म्हणूनच आयुष्य फुकट गेले तरी मी चौकटीबाहेर जात, वळणे घेत प्रयोग करतच राहणार,’ असे ठाम विधान करणारे ज्येष्ठ चित्रकार-कवी षांताराम पवार यांचे गुरुवारी सकाळी गोरेगाव येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
मुंबई : ‘...आणि म्हणूनच आयुष्य फुकट गेले तरी मी चौकटीबाहेर जात, वळणे घेत प्रयोग करतच राहणार,’ असे ठाम विधान करणारे ज्येष्ठ चित्रकार-कवी षांताराम पवार यांचे गुरुवारी सकाळी गोरेगाव येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अंधेरी येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चित्रालाही शब्दांची भाषा असते याची जाणीव करून देताना पवार यांनी जाहिरात, दृश्यकला, साहित्य क्षेत्रांत मोलाची कामगिरी केली. त्यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये १९६५ ते १९७५ या काळात अध्यापक म्हणून काम केले. मंगेश राजाध्यक्ष, पुरुषोत्तम बेर्डे, विकास गायतोंडे, रंजन जोशी आदी त्यांचे विद्यार्थी होते. त्यांनी पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘दीपस्तंभ’ हा ग्रंथ २०११ मध्ये प्रकशित केला होता.