Join us

ज्येष्ठ नाट्यनिर्माते मामा पेडणेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:06 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी रंगभूमीवर एकाहून एक सरस नाटकांची निर्मिती करणारे ज्येष्ठ नाट्यनिर्माते मामा पेडणेकर यांचे शुक्रवारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी रंगभूमीवर एकाहून एक सरस नाटकांची निर्मिती करणारे ज्येष्ठ नाट्यनिर्माते मामा पेडणेकर यांचे शुक्रवारी सकाळी ठाणे येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

नाट्यसृष्टीत बुकिंग क्लार्क, नाट्य व्यवस्थापक ते नाट्यनिर्माते अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द होती. संगीत एकच प्याला, बेबंदशाही, लग्नाची बेडी, बायका त्या बायकाच, नाते युगायुगाचे, मृत्युंजय, छावा, पंखांना ओढ पावलांची, नटसम्राट, राजसंन्यास आदी नाटकांची त्यांनी निर्मिती केली होती. १९८० च्या सुमारास माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये जनता दराने नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर, घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचे झवेरबेन नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांसाठी खुले केले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचा प्रदीर्घ काळ अनुभवलेली व्यक्ती पडद्याआड गेल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त होत आहे.

* बुकिंग खिडकीचा दांडगा अनुभव

शिवाजी मंदिरात शिरताना उजव्या बाजूला तिकीट खिडक्यांच्या पलिकडे बसलेले मामा दिसले की पावले थांबायची. मामांसोबत दोन मिनिटे बोलले तरी बरे वाटायचे. नव्या कलाकारांनाही मामा घरचे वाटायचे. नवीन नाटक किती आणि कसे चालेल, हे मामा परखडपणे सांगायचे. कारण बुकिंग खिडकीचा त्यांचा अनुभव दांडगा होता. खुर्चीवर बसलेले मामा, नाकावर किंचित घरंगळलेला चष्मा तसाच ठेवून मालवणी ढंगात तिकीट काढायला आलेल्या अनोळखी प्रेक्षकाशी संवाद साधायचे आणि तो अनोळखी प्रेक्षक तिकीट घेऊन निघताना मामांना मनापासून धन्यवाद द्यायचा. मामांनी या व्यवसायात अनके माणसे मिळवली. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता.

- विजय कदम (ज्येष्ठ रंगकर्मी)

-------------------------