ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार करणार विविध कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:43 AM2017-11-27T05:43:11+5:302017-11-27T06:19:55+5:30
ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके यांचे २५ जुलै २०१८ पासून जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त राज्य सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.
मुंबई : ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके यांचे २५ जुलै २०१८ पासून जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त राज्य सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी तावडे बोलत होते.
संगीतातील योगदानाबाबत राज्य शासनाकडून दरवर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो. रविवारी माटुंगा येथील यशवंतराव नाट्य मंदिरात आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे गतवर्षाचे मानकरी ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांच्या हस्ते पुष्पा पागधरे यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी आमदार हेमंत टकले, निर्माता दिग्दर्शक एन. चंद्रा, गायक श्रीधर फडके, आशाताई खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी तावडे यांनी पागधरे यांच्या गायनाचे कौतुक केले. २५ जुलै हा दिवस ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचा जन्मदिवस असून या दिवसापासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्य शासन विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. शास्त्रीय नृत्य, सुगम संगीत यांची विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. खेळ, नृत्य आणि गायनामुळे गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा भावनिक बुद्ध्यांक वाढणे आवश्यक असून यावर भर देण्यात येणार असल्याचेही तावडे म्हणाले.
पुरस्काराला उत्तर देताना पुष्पा पागधरे म्हणाल्या की, लतादीदींच्या नावाने असलेला हा पुरस्कार मिळावा हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. या पुरस्कारामुळे माझे स्वप्न पूर्ण झाले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ‘इतनी शक्ती हेमें देना दाता’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.