Join us

“ मला ती बडबडी म्हणायची”… आणि आठवणींना उजाळा देताना आशा भोसलेंचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:11 PM

मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात लतादीदींबाबत बोलताना सुरुवातीलाच आशा भोसले यांचा कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले.

संजय घावरे

मुंबई : मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात लतादीदींबाबत बोलताना सुरुवातीलाच आशा भोसले यांचा कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले. त्यानंतर स्वतः:ला सावरत त्यांनी दीदींच्या बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला.

“बाबांच्या पुण्यतिथीला दरवर्षी दीदी असायची तिच्याशिवाय पुरस्कार सोहळा करू असे वाटले नव्हते,” असे म्हणत आशा भोसले यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “दीदी हे एक न भूतो न भविष्यती अस व्यक्तिमत्त्व होतं. ती खूप शांत होती. मला ती बडबडी म्हणायची. तिला सर्व रंग खूप आवडायचे, पण तिने सफेद रंगाला आपलेसे केलं होतं. कायम साडी नेसायची. तिला कधी कोणी ड्रेस किंवा पॅन्टमध्ये पाहिलं नाही. १३ वर्षांची असल्यापासून तिने काम करायला सुरुवात केली. एकदा भयंकर ताप असतानाही परीची भूमिका केली होती,”असंही त्या म्हणाल्या. 

“एकदा आई-बाबा झोपलेले असताना ती स्वतः त्यांच्या पायाचे पाणी प्यायली आणि मलाही प्यायला लावले. १९४० मध्ये गाण्यांच्या रेकॉर्डवर पार्श्वगायकाचे नाव दिले जात नसायचं. केवळ कलाकारांची नावं दिली जायची. पार्श्वगायकाचं नाव द्यायची सुरुवात दीदींमुळे झाली. खेमचंद प्रकाश यांच्या चित्रपटात तिने 'आयेगा आयेगा आयेगा आनेवाला...' हे गाणं गायलं जे खूप गाजलं. तेंव्हापासून रेकॉर्डवर गायकांचं नाव येऊ लागलं. ती मला 'हब' म्हणायची. 'हब' म्हणजे कमी डोक्याची...  बालपणी कोल्हापूरमध्ये असताना आम्ही विटी-दांडूसह बरेच खेळ खेळायचो. दीदींमुळेच गायकांना रॉयल्टी सुरू झाली,” असंही त्यांनी सांगितलं. 

तिचं मंगेशकर या नावावर विशेष प्रेम होतं. त्यामुळे मंगेशकर या नावाचा उच्चारही वेगळ्या प्रकारे करायची. कधीच लग्नात गायली नाही. परदेशात जिथे भारतीय गायकांचं गाणं व्हायचं नाही फक्त गोऱ्या लोकांची गाणी व्हायची, त्या सर्व ठिकाणांवर दीदीन पहिलं गाणं गाण्याचा मान मिळवत भारतीय गायकांसाठी परदेशात नवं व्यासपीठ खुल केल्याचंही आशा भोसले म्हणाल्या. या सर्व मनोगताच्या वेळी आशाजींनी बऱ्याच वेळा दीदींची नक्कल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी गुजरातीमध्ये आभार मानले.

टॅग्स :आशा भोसलेलता मंगेशकर