Join us

Ramdas Kamat: नाट्यभूमीच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, ज्येष्ठ गायक रामदास कामत यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 9:11 AM

Ramdas Kamat Death: रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. १८ फेब्रुवारी १९३१ म्हापसा येथे जन्म झाला. व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही ज्यांनी तेवढय़ाच समर्थपणे उमटविली. 

मुंबई : ज्येष्ठ गायक, अभिनेते, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष पंडित रामदास कामत यांचे शनिवारी रात्री ९.४५ वाजता विलेपार्ले येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. 

रामदास कामत यांना नाटकाच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि उत्तम गायक, अभिनेते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत आणि नातू व नातसून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. १८ फेब्रुवारी १९३१ म्हापसा येथे जन्म झाला. व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही ज्यांनी तेवढय़ाच समर्थपणे उमटविली. 

लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी दि गोवा हिंदू असोसिएशनच्या 'संगीत संशय कल्लोळ' या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरूवात केली होती. 

कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत. १९६४ साली आलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाने रामदास कामत यांचे नांव घराघरांत पोहोचले आणि पुढ़े ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक 'ययाती देवयानी' आले आणि 'सर्वात्मका सर्वेश्वरा...' ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे 'धन्य ते गायनी कळा', 'मीरामधुरा', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली. नंतर रामदास कामत यांनी 'एकच प्याला', 'कान्होपात्रा', 'धन्य ते गायनी कळा', 'मदनाची मंजिरी', 'मानापमान', 'मीरा मधुरा', 'मृच्छकटिक', 'शारदा', 'संन्याशाचा संसार', 'सौभद्र', 'स्वरसम्राज्ञी', 'होनाजी बाळा' आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली. पण त्यातही 'मत्स्यगंधा' व 'ययाति आणि देवयानी' या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली.