गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 02:40 AM2021-04-08T02:40:39+5:302021-04-08T02:41:04+5:30
मॉर्डन मिल कम्पाऊंडमध्ये होणार अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे, गिरणी कामगारांना घर मिळावे म्हणून लढा देणारे आणि वेळप्रसंगी गिरणी कामगारांसाठी सरकारशी दोन हात करणारे गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर (७२) यांचे यांचे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता जे. जे. रुग्णालय येथे
निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, चार मुले, नातवंडे असा परिवार आहे.
गेले तीन ते चार वर्षे ते आजारी होते. बुधवारी सकाळी मेंदूतील रक्तस्त्राव गोठल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शरीराने त्यांना साथ न दिल्याने सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी मॉर्डन मिल कम्पाऊंड, सात रस्ता येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
दत्ता इस्वलकर यांनी २ ऑक्टोबर १९८९ साली गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्यास सुरुवात केली. त्याच दिवशी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. ते आजपर्यंत समितीचे अध्यक्ष होते. बंद पडलेल्या दहा गिरण्या १९८८-९० दशकात दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू केल्या. त्यांनी गिरणी कामगारांना स्वेच्छानिवृत्तीपोटी चांगले पैसेही मिळवून दिले. गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे आणि रोजगार मिळावा म्हणून १९९९ सालापासून आजपर्यंत दत्ता इस्वलकर यांचा संघर्ष सुरू होता. १५ हजार गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासह गिरणी चाळीतील ७ ते
८ हजार रहिवाशांना घरे मिळवून दिली. दत्ता सामंत यांच्यानंतर त्यांनी गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या निधनाने गिरणी कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे.