मुंबई - मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. त्यामुळे चार दिवसांपूर्वी त्यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.रत्नाकर मतकरी यांची १९५५ मधे, वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. त्यांनी मराठीमध्ये बालसाहित्यापासून नाटकांपर्यंत विपुल साहित्य लेखन केले होते.
मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहोचवला. मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.