मेट्रो-३ मार्गावर धोकादायक इमारतींच्या भागात कंपनेरहित रूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:09 AM2020-01-20T07:09:38+5:302020-01-20T07:09:54+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील ८७ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम झाले आहे. या मार्गिकेच्या काही भागांमध्ये हेरिटेज, जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील ८७ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम झाले आहे. या मार्गिकेच्या काही भागांमध्ये हेरिटेज, जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. या इमारतींना मेट्रोच्या कंपनांमुळे भविष्यात हानी पोहोचू नये म्हणून त्या भागातील मार्गिकेवर कंपनेरहित रूळ बसवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) घेण्यात आला आहे. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात येणारी ही देशातील पहिलीच मेट्रो मार्गिका आहे.
मेट्रो-३ मार्गिकेसाठी ५५ कि.मी.चे भुयारीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेमुळे सहा व्यावसायिक केंद्रे, पाच उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोकलने न जोडलेले परिसर जोडले जाणार आहेत. या मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांपैकी तेरा स्थानकांचे भुयारीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित तेरा मेट्रो स्थानकांचे भुयारीकरण येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. या मार्गावर काळबादेवी, गिरगाव आणि इतर काही भागांमध्ये जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. या इमारतींच्या जवळून मेट्रो मार्गिका भुयारीमार्गे जात असल्याने मेट्रो सुरू झाल्यावर या इमारतींना मेट्रोच्या कंपनांमुळे कोणताही धोका पोहोचू नये म्हणून एमएमआरसीने विशेष काळजी घेत या ठिकाणी कंपने न होणारे रूळ टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात या इमारतींना कोणताही धोका मेट्रोमुळे पोहोचणार नाही.
मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सुरू असताना काही भागांतील इमारतींना भेगा गेल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे एमएमआरसीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. मेट्रो-३ मार्गिकेवर मेट्रो सुरू झाल्यावर धावणाऱ्या मेट्रोचे चाक आणि रूळ यामध्ये जास्त घर्षण न होता कंपनेही रोखली जातील, असे तंत्रज्ञान एमएमआरसी मेट्रो-३ मार्गिकेवर बसवण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान लंडन, स्वीडन, मॉस्को आणि झुरीच या देशांमध्ये आहे. आता प्रथमच भारतामध्ये अशा पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
मेट्रो-३ मार्गिकेसाठी पहिली मेट्रो डिसेंबर २०२०मध्ये मुंबईमध्ये दाखल होणार आहे. यासह काळबादेवी गिरगाव येथील प्रकल्पग्रस्तांचा ते राहत असलेल्या ठिकाणीच पुनर्विकास होणार असून के-३ या पहिल्या पुनर्विकास इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट याच महिन्यामध्येच देण्यात येणार आहे. तर जी-३ इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट मे २०२०मध्ये देण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेचे संचलन आणि देखभाल कामाच्या निविदा फेब्रुवारीमध्ये मागविण्यात येतील. तर जायकाच्या कर्जाचा तिसरा टप्पा मार्चपर्यंत येणे अपेक्षित आहे. तसेच या वर्षी मार्गासाठी रूळ टाकण्याचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. यासह विविध प्रणालींच्या कामात आरेखन काम पूर्ण होऊन उपकंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.