कुलगुरूंचे नाव गुलदस्त्यातच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:18 AM2018-04-20T02:18:20+5:302018-04-20T02:18:20+5:30
मुलाखती पडल्या पार : कोणाची निवड होणार, उत्सुकता शिगेला
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची प्रतीक्षा संपता संपेना असेच दिसत आहे. कुलगुरूंच्या शर्यतीत असलेल्या अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्यानंतर गुरुवारी नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र राज्यपाल सी. विद्यासागर राव किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कुलगुरूंच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण असणार यासंबंधी कमालीची उत्सुकता शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आहे.
गुरुवारी सकाळी अंतिम पाच जणांना अंतिम सादरीकरणासाठी गुरुवारी राजभवनात आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११.३० वाजल्यापासून हे सादरीकरण राज्यपालांकडे करण्यात आले. डॉ. प्रमोद येवले (नागपूर विद्यापीठ), डॉ. सुहास पेडणेकर (रुईया कॉलेज), डॉ. विलास सकपाळ (अमरावती विद्यापीठ), डॉ. शरद कोंडेकर (जबलपूर विद्यापीठ), डॉ. अनिल कर्णिक (मुंबई विद्यापीठ) यांच्या मुलाखती कुलगुरूंनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुपारपर्यंत या मुलाखती पार पडल्या मात्र राज्यपाल किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कुलगुरू कोण असतील, याची घोषणा करण्यात आलेली नाही.
आज होणार घोषणा?
कुलगुरूंचे नाव आज का जाहीर झाले नाही, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी निवडलेल्या उमेदवाराच्या
नावात तफावत असल्यानेच निवड जाहीर करण्यात आली नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान, गुरुवारी जरी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा झाली नसली तरी आज ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई विद्यापीठाचा जागतिक स्तरावर ढासळत असलेला दर्जा सावरून विद्यापीठाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देऊ शकेल अशा सक्षम उमेदवाराचीच कुलगुरूपदी निवड व्हावी, अशी अपेक्षा शिक्षणक्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.