कुलगुरू संजय देशमुख यांचे राज्यपालांना पत्र; सेवेत रूजू होण्याची व्यक्त केली इच्छा, गोंधळाविषयी दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:41 AM2017-09-09T04:41:54+5:302017-09-09T04:42:06+5:30
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या गोंधळामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सध्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे
मुंबई : मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या गोंधळामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सध्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे, तसेच निकालात झालेल्या गोंधळाविषयी कुलगुरूंकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. आॅनलाइन निकालात गोंधळाविषयी माहिती देणारे विस्तृत पत्र कुलगुरूंनी राज्यपालांना पाठविले आहे, तसेच पुन्हा सेवेत रूजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सद्यस्थितीत राजभवनचे संपूर्ण लक्ष केवळ निकाल कसा लवकरात लवकर लागेल, याकडे असल्याचे समजते.
मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणी आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाइन राज्यपालांनी दिली होती, पण ही डेडलाइन विद्यापीठाला पाळता आली नाही. आॅगस्ट महिन्यातही विद्यापीठाने निकाल जाहीर केले नाहीत. त्या वेळी कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. महिना उलटूनही कुलगुरू रजेवरच आहेत. आता गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी रजा संपवून, पदभार स्वीकारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी तब्बल ३ हजार शब्दांचे पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिले आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय का घेण्यात आला? त्याची अंमलबजावणी कशी करण्यात आली? आपल्या कारकिर्दीत झालेले निकालांचे काम आणि आता सुरू असलेल्या निकालांच्या कामावर पत्रात कुलगुरुंनी स्पष्टीकरण दिले आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. राजभवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या केवळ मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अजूनही कुलगुरूंच्या पत्रावर राज्यपालांच्या कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.