मुंबई : राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना मिळाला आहे. नुकतीच या कुलगुरूंची निवड प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. या कुलगुरूपदाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान म्हणजेच रुसाच्या माध्यमातून चार महाविद्यालयांचे मिळून एक विद्यापीठ स्थापन केले जात आहे. त्यानुसार, डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठ मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कुलगुरूपदाच्या नियुक्तीमुळे कामकाजाला गती मिळणार आहे. डॉ. होमी भाभा विद्यापीठामध्ये शासकीय विज्ञान संस्था, मुंबई हे मुख्य कॉलेज आणि सिडनहॅम कॉलेज, एलफिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय या चार संस्थांचा समावेश आहे. डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना ‘चॉइस बेस्ड क्रेडिट सीस्टिम’नुसार आंतरज्ञानशाखीय पद्धतीने आवडीचे अभ्यासक्रम निवडता येतील. सिडनहॅम कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांला कला विषयासाठी एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे, तसेच त्याला विज्ञान संस्थेत विज्ञान शाखेच्या विषयनिवडीचे स्वातंत्र्यही असणार आहे. यामध्ये ६५ क्रेडिट असलेला मुख्य विषय असेल, तर उर्वरित ३५ क्रेडिट इतर विषयांमध्ये मिळविता येऊ शकणार आहेत.
पहिल्या क्लस्टर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:17 AM