कुलगुरू निवडीला आता वेग येणार, शोध समितीवर विद्यापीठाकडून श्यामलाल सोनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:09 AM2017-12-13T02:09:19+5:302017-12-13T02:09:37+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला आता वेग येणार आहे. कारण कुलगुरू निवडीसाठी नेमलेल्या समितीवर विद्यापीठातर्फे डॉ. श्यामलाल सोनी यांच्या नावाच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या अकॅडमिक आणि मॅनेजमेंटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला आता वेग येणार आहे. कारण कुलगुरू निवडीसाठी नेमलेल्या समितीवर विद्यापीठातर्फे डॉ. श्यामलाल सोनी यांच्या नावाच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या अकॅडमिक आणि मॅनेजमेंटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
आॅनलाइन असेसमेंटमध्ये झालेल्या गोंधळानंतर, आॅक्टोबर महिन्यात डॉ. संजय देशमुख यांची कुलगुरू पदावरून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर, रिक्त झालेल्या या पदावर पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध घेण्यासाठी तीन व्यक्तींचा समावेश असलेल्या शोध समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीवर सरकारतर्फे भूषण गगरानी, राज्यपाल यांच्यातर्फे इस्त्रोचे के. कस्तुरीरंगन यांची निवड करण्यात आली होती. आता उत्तराखंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे संचालक असलेल्या सोनी यांच्या निवडीमुळे ही समिती पूर्ण झाली असून, किमान आता तरी कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.