स्कूल कनेक्ट संपर्क अभियानात कुलगुरूंचा प्राचार्य-विद्यार्थ्यांशी संवाद

By रेश्मा शिवडेकर | Published: January 16, 2024 05:49 PM2024-01-16T17:49:29+5:302024-01-16T17:49:41+5:30

प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी भारतीय ज्ञान प्रणालीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Vice-Chancellor's interaction with Principal-Students in School Connect Sampark Abhiyan | स्कूल कनेक्ट संपर्क अभियानात कुलगुरूंचा प्राचार्य-विद्यार्थ्यांशी संवाद

स्कूल कनेक्ट संपर्क अभियानात कुलगुरूंचा प्राचार्य-विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या स्कूल कनेक्ट या संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विविध महाविद्यालयांतील प्राचार्यांशी संवाद साधला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व बिगर स्वायत्त ८१२ महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठामार्फत तीन आणि चार वर्षाचे सर्व विद्याशाखेचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

या शैक्षणिक वर्षापासून बारावी उत्तीर्ण झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेताना महाविद्यालयात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, विविध संधीच्या योजना, विविध व्हर्टिकल्स, द्वितीय वर्षासाठी भारतीय ज्ञान प्रणालीशी संबंधित महास्वयंम या पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम, ई-कंटेन्ट, तसेच प्राध्यापकांना एफडीपी अंतर्गत तयार करावयाचे ई-कंटेन्ट यासारख्या अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर कुलगुरूनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तृतीय वर्षाला प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग, कम्युनिटी प्रोजेक्ट, फिल्ड प्रोजेक्ट अशा अनुषंगिक बाबींचीही माहिती त्यांनी दिली. १ ते ४ व्हर्टिकल्सच्या मूल्यांकनाची पारंपारिक पद्धत आणि ५ आणि ६ व्या व्हर्टिकलच्या मूल्यांकनाची पद्धतही त्यांनी यावेळी उपस्थितांना समजावून सांगितली. प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी भारतीय ज्ञान प्रणालीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राच्या ३४ टक्के या सकल नोंदणीच्या (जीएआर) प्रमाणात वाढ करण्यासाठी तसेच १६ ते २२ या वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी स्कूल कनेक्ट हे अभियान राबविले जात आहे. विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध समूह, लीड आणि सलंग्न महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते.

शिक्षण दूत
दुपारच्या सत्रात शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी यांच्याशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक सूचना, अंमलबजावणी आणि तरतूदी यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षणदूत म्हणून हे प्रतिनिधी मोठी जबाबदारी पार पडणार असून त्यांच्या-त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात जाऊन इतराना प्रशिक्षित करू शकतील. अनेक मुख्याध्यापक आणि प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकाचे समाधान आणि निरसन मार्गदर्शकांकडून करण्यात आले.

ठाणे, पालघर, रायगडमध्ये संवाद
या अभियानाअंतर्गत १७ तारखेला ठाणे आणि रायगड, १८ तारखेला पालघर, २३ तारखेला रत्नागिरी आणि २४ तारखेला सिंधुदुर्ग येथील विविध महाविद्यालयांशी संवाद साधला जाणार आहे.

Web Title: Vice-Chancellor's interaction with Principal-Students in School Connect Sampark Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.