कुलगुरू-प्राचार्यांची संवाद भेट! विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:32 AM2017-09-26T04:32:01+5:302017-09-26T04:32:08+5:30
मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत सोमवारी सहविचार बैठक घेतली.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत सोमवारी सहविचार बैठक घेतली. या संवाद भेटीदरम्यान विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालये यांच्यातील अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
प्रथम सत्र २०१७ च्या सर्व ४७७ परीक्षांचे निकाल लावण्यासाठी प्राचार्य आणि शिक्षक संवर्गातून झालेल्या सहकार्याबद्दल शिंदे यांनी सर्व प्राचार्यांचे आभार मानले. प्रशासकीय, शैक्षणिक, परीक्षा आणि वित्त व लेखा या प्रमुख चार विषयांवर कुलगुरूंनी प्राचार्यांसोबत चर्चा केली. ते म्हणाले की, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे गठण करणे, अधिकार मंडळे स्थापन करणे, तसेच संविधानिक पदावरील नियुक्त्यांची प्राथमिक तयारी विद्यापीठाने केली आहे. त्याचबरोबर नामनिर्देशनाच्या प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात होईल. शिक्षण पद्धतीत होणाºया बदलांची नोंद घेत उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी शैक्षणिक लेखा परीक्षणासाठी तयार व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक स्पर्धेत उच्च शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शैक्षणिक लेखा परीक्षण ही काळाची गरज असून अध्ययन व अध्यापन पद्धतीमध्ये अधिकाधिक आयसीटीचा वापर व्हावा, असेही त्यांनी नमूद केले. नॅक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी यासाठी महाविद्यालये, समूह महाविद्यालये आणि जिल्हापातळीवर कार्यशाळेचे आयोजन करून अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करावा, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक महाविद्यालयाने अभ्यासगटाच्या माध्यमातून कार्यअहवाल तयार करून घेण्याचे त्यांनी सुचविले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही!
निकाल विलंबामुळे पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया अजून सुरू असून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. महाविद्यालयांनी अधिकचे वर्ग, मेकअप क्लासरूम घेऊन अभ्यासक्रम पूर्ण होईल याची सर्वच स्तरातून काळजी घ्यावी. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची जवळपास २५ कोटींची रक्कम थकीत असून महाविद्यालयांनी ती विद्यापीठाकडे वर्ग करण्याची विनंती कुलगुरूंनी केली.
राखीव निकाल लवकरच लावणार
काही विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव ठेवले असून तांत्रिक अडचणी आणि उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन करून ते निकाल लवकरच लावले जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले. त्याचबरोबर पुनर्मूल्यांकनासाठी आजमितीस विद्यापीठाकडे जवळपास ५० हजार अर्ज आले असून या कामीही शिक्षकांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्तरपुस्तिका तपासणीसाठी विद्यापीठाकडे जवळपास १४ हजार शिक्षकांची यादी असून ही यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. घाटुळे यांनी सांगितले.