Join us

हे तर प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे बळी - स्थानिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 2:22 AM

भांडुप पश्चिमेकडील पिंपळेश्वर कॉलनी, साई सदन चाळ येथील सार्वजनिक शौचालय शनिवारी सकाळी ६च्या सुमारास खचले.

मुंबई : भांडुप पश्चिमेकडील पिंपळेश्वर कॉलनी, साई सदन चाळ येथील सार्वजनिक शौचालय शनिवारी सकाळी ६च्या सुमारास खचले. या दुर्घटनेमध्ये लोबाबेन धीरभाई जेठवा (४२) आणि बाबुलाल झोमाजी देवासे (४५) यांचा जागी मृत्यू झाला. सुमारे ३५ वर्षांपूर्वी हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यानंतर, स्थानिक लोकप्रतिनिधीमार्फत १९९६ साली सार्वजनिक शौचालयाची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर, २२ वर्षांमध्ये प्रशासनाकडून एकदाही शौचालयाकडे लक्ष दिले गेले नाही. परिणामी, शौचालय खचण्याची घटना घडली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून, येथे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी मोबाइल बायोटॉयलेटची व्यवस्था करण्यात आली. शौचालयाचा राडारोडा पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत उचण्यात आला, तसेच फुटलेल्या टाकीतील घाण जमा करण्यासाठी पालिकेचे वाहन दाखल झाले होते. साई सदन चाळीतील ७० ते ८० टक्के घरांमध्ये घरगुती शौचालये आहेत. त्यामुळे येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर २० ते ३० टक्के लोकच करायचे. या कारणास्तव शौचालयाच्या स्थितीकडे प्रशासनाने पाहिले नाही. शौचालयाची टाकीही पालिकेकडून साफ करण्यात आली नाही.त्यामुळे टाकीत जास्त घाण जमा होऊन गॅस तयार झाला. याच गॅसचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात आली. शौचालयाला घुशीनेदेखील पोखरून काढले होते. परिणामी, दोन शौचालयांचे भांडे खचले होते. मात्र, या शौचालयाकडे कानाडोळा करण्यात आल्याने, शौचालय जमीनदोस्त होऊन दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. सध्या शाळेला सुट्टी असल्याने अनेक जण गावाला गेले आहेत. त्यामुळे सुदैवाने बळींची संख्यावाढली नाही, असेही स्थानिकांनी सांगितले.१८० घरांतील पुरुष आणि महिलांसाठी एकत्रितरीत्या फक्त २० शौचकुपे असलेल्या सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था होती. परिणामी, काही वेळेस येथे गर्दीचे प्रमाण वाढत होते. सकाळच्या सुमारास अनेक जण घरात शौचालय असूनदेखील या शौचालयाचा वापर करायचे. त्यामुळे येथे गर्दी वाढत होती, असेही स्थानिकांनी सांगितले.लोबाबेन धीरुभाई जेठवा यांच्या पश्चात पती, १६ आणि २२ वर्षांची दोन मुले आणि १९ वर्षांची एक मुलगी आहे. लोबाबेन यांच्या पतीचा टेलरचा व्यवसाय आहे.मूळच्या राजस्थानच्या असलेल्या लोबाबेन आपल्या परिवारासह मागील अनेक वर्षांपासून येथील चाळीत भाड्याने राहत होत्या.बाबुलाल झोमाजी देवासी एका खासगी दुकानात कामगार होते. यांच्या पश्चात चार लहान मुले आहेत. बाबुलाल यांची पत्नी गृहिणी आहे.