मुंबई - ओळखीच्या महिलेला मुंबई येथे शिक्षिका पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी शहरात घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. मेहबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर , बीड ) असे आरोपीचे नाव आहे. त्यावरुन चांगलंच राजकारण तापलं असून भाजपा नेत्यांकडून मेहबुब शेखला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे यांचे पत्र शेअर करत, आमच्याप्रमाणेच उपसभापतींनीही औरंगाबादच्या घटनेत पीडितेवर दबाव आणला जात असल्याचं सांगितलंय, असे वाघ यांनी म्हटलंय.
औरंगाबादमधील बलात्कार प्रकरणी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार तरुणी शहरातील रहिवासी असून तिचे शिक्षण बी.ए. डीएड असे झाले आहे. सध्या बेरोजगार असल्याने ती कॉलनीतील मुलांचे ट्युशन घेते. ओळखीनंतर आरोपीने तिला मुंबईत शिक्षिका पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने तिच्याशी जवळीक वाढविली. दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी रात्री तिला भेटला. यानंतर त्याने तिला त्याच्या चारचाकी वाहनात बसविले. फेरफटका मारून येऊ असे म्हणून तो तिला निर्मनुष्य स्थळी घेऊन गेला. तेथे त्याने बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने नोंदविली. या प्रकारामुळे पीडिता आजारी पडली होती. शिवाय ती घाबरून गेली होती. यामुळे तिने याविषयी पोलिसांत तक्रार केली नव्हती. दरम्यान शनिवारी रात्री तिने सिडको पोलिस ठाणे गाठून याविषयी तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा पाटील तपास करीत आहेत.