मुंबईत दिवसभरात कोरोनाचा एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:08 AM2021-09-22T04:08:25+5:302021-09-22T04:08:25+5:30
निच्चांकी नोंद , एकूण चाचण्यांचा एक कोटींचा टप्पा पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शहर उपनगरात काही दिवसांपूर्वी ५०० ...
निच्चांकी नोंद , एकूण चाचण्यांचा एक कोटींचा टप्पा पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहर उपनगरात काही दिवसांपूर्वी ५०० च्या घरात गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबईत मंगळवारी ३५२ रुग्ण आणि केवळ एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. दिवसभरात ३६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७ लाख १५ हजार ७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४ हजार ५८३ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १ हजार १७७ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. १४ ते २० सप्टेंबरदरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात २४ हजार ९०७ चाचण्या करण्यात आल्या तर एकूण चाचण्यांच्या संख्येने १ कोटीचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत १ कोटी १८ हजार ७७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आता मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ३८ हजार ८७६ असून मृतांचा आकडा १६ हजार ५९ इतका आहे. शहर उपनगरात चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४५ इतकी आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २ हजार ७९७ अतिजोखमीच्या संपर्काचा शोध घेतला आहे.