दहा तासात चौघांचा बळी
By admin | Published: January 11, 2017 04:19 AM2017-01-11T04:19:49+5:302017-01-11T04:19:49+5:30
मुंबईतील विक्रोळी, ताडदेव आणि शिवडी परिसरात झालेल्या अपघातात दहा तासांत चौघांचा बळी गेला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
मुंबई : मुंबईतील विक्रोळी, ताडदेव आणि शिवडी परिसरात झालेल्या अपघातात दहा तासांत चौघांचा बळी गेला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
कल्याण येथील दिनेश कुलकर्णी (२६) आणि जितेश निगम (२६) हे सोमवारी रात्री वर्सोवा येथे मित्राकडे पार्टीसाठी आले होते. दोघे कारमधून घरी परतताना पहाटे पावणे सहाच्या सुमारास विक्रोळी फिरोज शहा मार्गावरुन जाताना निकमचा नशेमुळे कारवरचा ताबा सुटला. त्याने पुढे जात असलेल्या टे्रलरमध्ये गाडी चढविली. या भीषण अपघातात दोघेही जखमी झाले. पोलिसांनी दोघांनाही बाहेर काढले. त्यांना तत्काळ विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात नेले. कुलकर्णीला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर निकमवर उपचार सुरु आहेत. दिनेश हा उद्योजिका व पद्मश्री कल्पना सरोज यांचा नातू होता.
ताडदेव परिसरात सकाळी नउच्या सुमारास आजीकडे निघालेल्या २४ वर्षीय राहुल मोरेचा डम्परच्या धडकेत मृत्यू झाला. तो विनाहेल्मेट होता. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार बसला. सोमवारी रात्री शिवडीतील सलमान अब्दुल जब्बा खान उर्फ बोबो (२२) हा सलमान नफिस खान (२४) या मित्राला सोबत घेऊन तो बाईकवरून फिरण्यासाठी घराबाहेर पडला. जाकेरीया बंदर रोडवरुन भरधाव वेगाने जाताना बामर लॉरी कंपनी जवळ ट्रकने अचानक यु टर्न घेतला. परंतू बाईकचा वेग अधिक असल्याने बोबोला काहीच करता आले नाही. त्याच्या बाईकने ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. (प्रतिनिधी)