५१ कोटींच्या अभावाचे बळी...‘परळ टर्मिनस प्रकल्पा’ला निधीची टाळाटाळ भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 04:23 AM2017-09-30T04:23:26+5:302017-09-30T04:23:48+5:30
पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर शुक्रवारी मृत्यूने थैमान घातले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी परळ टर्मिनसबाबत पत्रव्यवहार केला होता.
- महेश चेमटे
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर शुक्रवारी मृत्यूने थैमान घातले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी परळ टर्मिनसबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र निधीच्या अभावाचे कारण रेल्वेकडून सातत्याने देण्यात येत होते. परिणामी पूल आणि अन्य कामे होत नसल्याचे उत्तर तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. निधीची मागणी तातडीने पूर्ण झाली असती तर २२ निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचले असते, अशा प्रतिक्रिया रेल्वेप्रवाशांत जनसामान्यांत उमटत आहे.
दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन आणि मध्य रेल्वेवरील परळ या दोन स्थानकांना जोडणारा पूल अपुरा पडत आहे. एल्फिन्स्टन भागात व्यावसायिक कार्यालये असल्याने कर्मचारी मोठ्या संख्येने याचा वापर करतात. त्याचबरोबर परळ भागात केईएम, टाटा यासारख्या महत्त्वाची रुग्णालयात आहेत. त्यामुळे एल्फिन्स्टन आणि परळ येथे १२ मीटर रूंद पादचारी पूल बांधण्याची मागणी अरविंद सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती.
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अरविंद सावंत यांना पत्र पाठवून उत्तर दिले होते. प्रवाशांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करणे गरजेचे असते. पण निधीच्या अभावी आणि तांत्रिक कारणामुळे ही मागणी त्वरित पूर्ण करणे शक्य नाही, अशा आशयाचे पत्र सुरेश प्रभूंनी २० फेब्रुवारी २०१६ रोजी पाठवले होते.
सचू उठ....
मयत पतीला पत्नीची आर्त साद
एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेत डोंबिवलीतील सचिन कदम (40, रा. विहंग अपार्टमेंट, देवीचौक) या घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एल्फिन्स्टन येथे हॉलमार्क लिफ्ट प्रा.लिमिटेड या कंपनीत ते क्लार्कचे काम करायचे. बालपणापासून कदम डोंबिवलीतच वास्तव्याला होते. त्यांच्या मृत्युच्या बातमीने धक्का बसल्याने सचू, उठ का झोपलास, अशी हाक पत्नी सुचिता सतत मारत होत्या.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा (७), भाऊ असा परिवार आहे. पती गेल्याचे पत्नी सुचिता स्वीकारत नसल्याने तिची समजूत कशी काढावी हा मोठा प्रश्न कुटुंबियासमोर होता. या घटनेचा त्यांना प्रचंड धसका घेतला आहे. पुढं काय होणार, मुलगा तनिष्क याला डॉक्टर कसे बनवणार? असे सवाल त्या करत होत्या. सकाळी त्या साडेआठच्या सुमारास पतीला सोडायला डोबिवली रेल्वे स्थानकापर्यँत गेल्या होत्या. घरात नवरात्रीचे घट बसले असल्याने अघटित होणारच नाही असं त्या सांगत होत्या.
११ वर्षांच्या रोहितने गमावला जीव
एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेत विक्रोळीच्या परब कुटुंबातील अकरा वर्षांच्या रोहितचा मृत्यू झाला असून मोठा भाऊ आकाश याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फुले खरेदीला निघालेली ही भावंडे या दुर्घटनेचा बळी ठरली. विक्रोळी येथील आकाश परब (१९) आणि त्याचा लहान भाऊ रोहित (११) दोघेही शुक्रवारी सकाळी घरातून निघाले. त्यांनी ट्रेन पकडली आणि एल्फिन्स्टनला पोहोचले. एल्फिन्स्टनच्या पुलावर पाऊस थांबण्याची वाट पाहत गप्पा मारत होतो, अचानक काहीतरी झाले चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यामुळे मी व रोहित वेगळे झालो. शुद्ध आली तेव्हा मी केईएम रुग्णालयात होतो आणि रोहित माझ्यासोबत नव्हता, असे मानसिक धक्का बसलेला आकाश सांगत होता. या चेंगराचेंगरीत आकाशच्या पायाला मार लागला आहे. केईएम रूग्णालयाने मृतांची यादी जाहीर केली आहे. त्यात ११ वर्षांच्या रोहितचेही नाव आहे.
आम्ही बोलणार नाही, काम बोलणार....
एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी रात्री साडेसात वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीनंतर गोयल म्हणाले, की ही खूप दुर्दैवी घटना आहे. तपासाअंती पूर्ण तपशील मिळेल.
आजची रात्र रेल्वे कर्मचाºयांना कामाच्या तयारीसाठी वेळ देण्यात आला आहे. शनिवारी दिल्ली येथून रेल्वे बोर्डाचे अधिकारी आल्यानंतर पुन्हा बैठक होईल. दसरा असून देखील रेल्वे कर्मचारी युद्धस्तरावर काम करणार आहे. सुरक्षेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
सहा महिन्यांचे बाळ पोरके
प्रसूतीनंतर कार्यालयात रुजू होऊन अवघे काही दिवस झाले असताना लोअर परळच्या तेरेसा फर्नांडिस यांना मृत्यूने गाठले. लोअर परळ येथील मॉलच्या कार्यालयात काम करणाºया तेरेसा यांचे कार्यालय लवकरच अंधेरी साकीनाका विभागात शिफ्ट होणार आहे. शुक्रवारी लोअर परळ येथील आॅफिसचा अखेरचा दिवस भरण्यासाठी कार्यालयात आलेल्या तेरेसा यांना सकाळीच एल्फिन्स्टन दुर्घटनेत प्राण गमवावा लागला. त्यांच्या जाण्याने सहा महिन्यांचा चिमुरडा आईपासून दुरावलाय, हे सांगताना फर्नांडिस कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. एल्फिन्स्टन स्टेशनवरून जाण्याचा तेरेसा यांचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यांचे आॅफिस अंधेरीतील साकी नाका येथे शिफ्ट होणार होते.
कुटुंबाचा ‘आधार’ हरपला
पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची कूस धरलेल्या उत्तरप्रदेश येथील मसूद आलमला एल्फिन्स्टन रोडवरील चेंगराचेंगरीत मृत्यूने गाठले. उतारवयातील आई-वडील, चार लहान मुले यांचा उदरनिर्वाह मसूदवरच अवलंबून होता. आता या कुटुंबाला वाली कोण, आमच्या कुटुंबाचा आधारच हरपलाय, हे सांगताना मसूदचा चुलतभाऊ नजमुल हसन याचा अश्रूंचा बांध फुटला. केईएम रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर मसूदच्या मृतदेहाची वाट पाहत थांबलेला हसन आता मसूदच्या आई-वडिलांना काय उत्तर देऊ असे म्हणत थेट खालीच कोसळला. एल्फिन्स्टनमधील गारमेंट कंपनीमध्ये गोवंडीला राहणारा ३४ वर्षांचा मसूद काम करत होता. या कंपनीत काम करून कुटुंबाला अधिकचा हातभार लावण्यासाठी शिलाईची कामेही करत असे. आता त्याच्या लहानग्यांना पत्नीने कसे सांभाळायचे असा प्रश्न हसन विचारत होता.
श्रद्धा कामावर गेली
ती घरी परतलीच नाही
कल्याण : पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारी श्रद्धा वरपे शुक्रवारी कामावर गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या चेंगराचेंगरीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. खडेगोळवली परिसरातील शिवशक्ती कॉलनीनजीक असलेल्या रामनगरमध्ये श्रद्धा कुटुंबासह राहत होती. तिचा मोठा भाऊ रूपेश बँकेत, तर लहान भाऊ राकेश एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आई गृहिणी आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला कामगार कल्याण मंडळात नोकरी लागली होती. तेथेच तिचे वडील किशोर हेही कामाला आहेत. वडील आणि मुलगी एकाच कार्यालयात कामाला असले तरी त्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ््या होत्या. त्यामुळे वडील सकाळी लवकर कार्यालय गाठायचे. त्यानंतर श्रद्धा वडिलांच्या पाठोपाठ जाणारी गाडी पकडत असे.