गैरव्यवस्थेचे बळी
By admin | Published: June 15, 2014 12:05 AM2014-06-15T00:05:07+5:302014-06-15T00:05:07+5:30
खेड्यापाड्यांतून आलेले हे तरुण भरतीच्या ठिकाणी मध्यरात्री पोहोचून मिळेल त्या जागेवर आसरा घेतात़ खाद्यपदार्थाची उपलब्धता तर दूरच, पिण्यासाठी पुरेसे पाणीही त्यांना उपलब्ध करून दिले जात नाही.
खेड्यापाड्यांतून आलेले हे तरुण भरतीच्या ठिकाणी मध्यरात्री पोहोचून मिळेल त्या जागेवर आसरा घेतात़ खाद्यपदार्थाची उपलब्धता तर दूरच, पिण्यासाठी पुरेसे पाणीही त्यांना उपलब्ध करून दिले जात नाही. त्यांचा नंबर येईपर्यंत दुपार होते. पोटात अन्नाचा कण नसतानाही रखरखत्या उनामध्ये जीवाचा आटापिटा करत हे तरुण धावताना त्यांची काय अवस्था होत असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. अशा गैरव्यवस्थेमुळे अंबादास सोनावणे, प्रसाद माळी, विशाल केदारे व राहुल सकपाळ या तरुणांचा बळी गेला आहे. नागपूूरमध्ये सुनील येळे हा युवक अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
पोलीस दलात शारीरिकदृष्ट्या सुदृढ, चपळ असलेल्यांचा समावेश असला पाहिजे, यात कोणाचेही दुमत नाही. मात्र, त्यासाठी अमानवी पद्धतीने लावली जाणारी मोजमाप पट्टी, त्या ठिकाणच्या असुविधांनी या तरुणांचा बळी घेतला आहे. आता भरतीतील या गैरव्यवस्थेबद्दल ओरड सुरू झाल्यानंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत व भरती प्रक्रियेत काही बदल करण्याची विधानसभेत घोषणा केली आहे. मात्र, ही सुधारणा यापूर्वी करण्याची सुबुद्धी आबा, गृह खाते व वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना का झाली नाही, त्यासाठी निष्पाप तरुणांच्या बळीची प्रतीक्षा होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. भीक नको पण कुत्रे आवर, या म्हणीच्या उक्तीप्रमाणे खाकी वर्दी नको पण या अमानवी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या शारीरिक क्षमतेच्या परीक्षा आवरा, अशी ओरड भरतीतील साडेपाच लाखांवर उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.
राज्य पोलीस दलाची कुमक जवळपास दोन लाख असली तरी लोकसंख्या व वाढती गुन्हेगारीचा विचार करता हे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये ६० हजार पदे टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये नवीन व रिक्त अशा १५ हजार ८२ कॉन्स्टेबल पदासाठी सध्या भरती केली जात आहे. त्यासाठी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५ लाख ८२ हजार २५१ युवक-युवती सज्ज झाले आहेत. वाढती बेरोजगारी, खासगी नोकरीतील अस्थैर्यामुळे भरतीसाठी उमेदवारांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. बारावीपर्यंत शिक्षणाची अट असताना पदवीधर, द्विपदवीधर तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई आयुक्तालयांंतर्गत सर्वाधिक २५७० पदे भरली जाणार असल्याने नेहमीप्रमाणे या ठिकाणी इच्छुकांची संख्या प्रचंड म्हणजे १ लाख १३०५ इतकी आहे.
पोलीस भरतीमधील गैरव्यवहार, वशिलेबाजी टाळली जाऊन पारदर्शीपणा यावा, या हेतूने गेल्या वर्षापासून उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखत) घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. त्याऐवजी शारीरिक क्षमतेच्या चाचण्या आणि लेखी परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारावर नियुक्ती केली जात आहे. त्यामध्ये पूर्वीच्या ८०० मीटर धावण्याऐवजी ५ किमी धावणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नोंदवलेल्या वेळेनुसार उमेदवारांना गुण दिले, मात्र त्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्याची आवश्यकता असताना येनकेन प्रकारे ही प्रक्रिया पार पाडण्याकडे बहुतांश घटकप्रमुखांचा भर राहिला आहे. शारीरिक चाचण्या या सकाळी ९ पूर्वी आणि दुपारी ४ नंतर घेण्यात याव्यात. म्हणजे प्रशिक्षणार्थींना उन्हाचा तडाखा बसू नये, अशा सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र मुंबईतील भरतीच्या चारही ठिकाणी येनकेनप्रकारे भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. घरापासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या या उमेदवारांसाठी थांबण्यासाठी कसलीही सोयी-सुविधा नाही. भरतीत सहभागी करून आपण त्यांच्यावर मोठा उपकार करत आहोत, असा आविर्भाव भरतीच्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. आता या निष्क्रियतेमुळे ४ जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईच्या पोलिसांना जाग आली आहे.