निष्काळजीचे बळी : राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:00 AM2018-01-01T06:00:37+5:302018-01-01T06:01:57+5:30
कमला मिल जळीतकांडानंतर राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. इतर वेळी मुंबईतील प्रश्नांवर शिवसेनेला लक्ष्य करणा-या भाजपा नेत्यांचीकमला मिल प्रकरणी कोंडी झाल्याचे चित्र आहे. भाजपा नेते आणि आमदारांच्या दबावामुळेच पालिका प्रशासनाने येथील अनियमिततांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
मुंबई : कमला मिल जळीतकांडानंतर राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. इतर वेळी मुंबईतील प्रश्नांवर शिवसेनेला लक्ष्य करणा-या भाजपा नेत्यांचीकमला मिल प्रकरणी कोंडी झाल्याचे चित्र आहे. भाजपा नेते आणि आमदारांच्या दबावामुळेच पालिका प्रशासनाने येथील अनियमिततांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यावर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कथित एफएसआय घोटाळ्याचा आरोप मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे, तर सरकारचे अपयश झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा पटलवार चव्हाण यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी कमला मिल येथील जळीतकांडाचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस सरकारच्या काळात आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली वाढीव एफएसआयची खैरात वाटण्यात आली. एफएसआय घेऊन आयटी पार्कऐवजी मुंबईत हॉटेलसारखे उद्योग फोफावले. त्यामुळे सरकारचा ५०० कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. अनधिकृत हॉटेल्समुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे कमला मिलमधील दुर्घटनेला काँग्रेस जबाबदार आहे. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उत्तर द्यावे, असे आव्हानच शेलार यांनी दिले आहे.
आशिष शेलार यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे उत्तर अशोक चव्हाण यांनी दिले आहे. कमला मिल दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे भ्रष्ट प्रशासन जबाबदार आहे. सरकारचे अपयश झाकण्यास शेलार बिनबुडाचे आरोप करीत आहेत. आयटी पार्कला सवलती देण्याचे शासनाचे धोरण होते. या सवलतींचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे. एफएसआयचा गैरवापर होत होता, तर महापालिका व राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत कारवाई का केली नाही, असा प्रश्नही चव्हाण यांनी विचारला.
हुक्का पार्लर, जिमखान्यावर बडगा : हॉटेल व बारसह मुंबईतील हुक्का पार्लर व जिमखान्यांकडेही मनपाने आपला मोर्चा वळवल्याचे दिसले. धारावीत मोठ्या संख्येने असलेल्या हुक्का पार्लरवरही मनपाने रविवारी कारवाईचा बडगा उगारला. एच वेस्ट वॉर्डमधील क्लब आणि जिमखान्यावरही कारवाई केली आहे. त्यात ओट्टर क्लब, खार जिमखाना, वांद्रे जिमखाना आणि वेलिंगकर जिमखान्याचा समावेश आहे.
या हॉटेलवर कारवाई
हॉटेल शिवसागर, हॉटेल बालाजी, बालाजी कॉर्नर, गुरुकृपा हॉटेल, मिलन ज्यूस अॅण्ड स्नॅक्स आदी हॉटेलांमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. तर गोरेगाव पूर्वेकडील लकी हॉटेल, चेंबूर येथील खानाखजाना, अंधेरीतील बॉम्बे ठेका, एल वॉर्डातील हॉटेल इन हॉलिडे, वर्सोव्यातील हॉटेल मढ, साकीनाक्यातील बार स्टॉक एक्सचेंज आणि मालाडमधील मंत्रा हॉटेलमधील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. महालक्ष्मी मंदिराजवळील कॅफे फुमो या रूफटॉप हॉटेलवरील छतही पालिकेने तोडून टाकले आहे.
अधिकारी उपस्थित
केवळ कारवाईचे आदेश न देता महापालिकेचे वॉर्डमधील अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त प्रत्येक कारवाईवेळी जातीने हजर असल्याचे रविवारी दिसले. त्यात अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आय.ए. कुंदन आणि आबासाहेब जºहाड यांचा समावेश होता. तर अजय मेहता सर्व कारवाईचा आढावा घेताना दिसले.
‘रूफटॉप धोरण रद्द करा’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेतील भ्रष्ट अधिकाºयांच्या धोरणामुळे कमला मिल कंपाउंडमध्ये जळीतकांड घडले आहे. या अपघातामुळे रूफटॉपवरील हॉटेल्सना परवानगी देण्याच्या महापालिकेच्या धोरणातील विसंगती समोर आल्या आहेत. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मनमानी पद्धतीने रूफटॉप धोरण मंजूर करवून घेतले आहे. कोणाच्या दबावाखाली पालिका आयुक्तांना हा निर्णय घेतला, असा सवाल करत हे धोरण रद्द करण्याची मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.