मेट्रोसाठी सहा हजार झाडांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:51 AM2018-07-17T01:51:38+5:302018-07-17T01:51:41+5:30
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) या प्रकल्पासाठी एमएमआरसीने आतापर्यंत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्ष छाटणीसाठी तब्बल ३४२६ प्रस्ताव सादर केले आहेत.
- अजय परचुरे
मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) या प्रकल्पासाठी एमएमआरसीने आतापर्यंत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्ष छाटणीसाठी तब्बल ३४२६ प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानंतर आता मेट्रो-३ प्रकल्पाच्या मुंबई सेंट्रल येथे होणाऱ्या कामासाठी ७६ झाडांचा अडथळा येत आहे. त्याचीही तोडणी करण्याचा प्रस्ताव एमएमआरसीने पालिकेकडे सादर केला आहे. हे प्रस्ताव आणि यातील झाडांची संख्या पाहता मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामात एकूण ६००० हून जास्त झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी वाढली आहे.
माहितीच्या अधिकारात पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी यासंदर्भात जी माहिती मिळवली त्यातही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुळात मेट्रो-३ हा प्रकल्प ३२.५ किलोमीटरचा आहे. मेट्रो-३ च्या मुळ आराखड्यानुसार या मार्गात येणारी २८०१ झाडे तोडण्याची गरज होती. त्यासंबंधीची परवानगी एमएमआरसीने मे २०१७ मध्ये संबंधितांकडून घेतली. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने या मार्गावरील १५ रेल्वे स्थानकांसाठी आणखी २१४ झाडांच्या छाटणीसंदर्भात नवीन प्रस्ताव पालिकेसमोर आणला. त्यानंतरही असे प्रस्ताव पालिकेसमोर येतच राहिले. लॉन्चिंग शाफ्ट आणि कास्टिंग यार्डसाठी ३१ झाडे, आरे कास्टिंग यार्डसाठी ४९ झाडे, आरे लॉन्चिंग शााफ्टसाठी २३ झाडे, आरे इलेक्ट्रिकल टॉवर शिफ्टसाठी १३७ झाडे, आरे स्थानकातून आरे कारशेडमध्ये मेट्रो जाण्यासाठी ३०७ झाडे, आरे कारशेडसाठी २६६५ झाडे अशा एकूण ३४२६ झाडांच्या छाटणीचे प्रस्ताव मेट्रो प्रशासनाने याआधी केले आहेत. त्यामुळे मुळ आराखड्यानुसार २८०१ , अतिरिक्त प्रस्तावाची ३४२६ झाडे आणि आता नवीन प्रस्तावानुसार ७६ झाडे याची बेरीज केल्यास तब्बल ६००० झाडांचा बळी या एकट्या प्रकल्पामुळे जाण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पर्यावरणप्रेमींनी आणि झोरू बाथेना यांनी या झाडांच्या झाटणीविरोधात उच्च न्यायलयात मेट्रो प्रशासनाविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. सध्याच्या मेट्रो प्रशासनाच्या नवीन ७६ झाडांच्या छाटणीविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनंतर उच्च न्यायलयाने मेट्रो प्रशासनाला वृक्ष प्र्राधिकरणाऐवजी उच्च न्यायालयात येऊन याविषयीची मंजुरी आणि आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
एका प्रकल्पासाठी इतक्या प्रमाणात झाडांची कत्तल करू नये म्हणून पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. काहीही करून ही वृक्ष छाटणी थांबवण्यासाठी त्यांनी उच्च न्यायलयाचे दार ठोठावले आहे.
>लढा पर्यावरणाचा
आमचा मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही मात्र तो प्रकल्प पूर्ण करताना झाडांची बेसुमार कत्तल करू नका इतकेच आमचे म्हणणे आहे आणि आम्ही त्यासाठी, पर्यावरणासाठी लढतोय अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मेट्रो प्रशासनाने नवीन झाडे लावण्याची तयारी दाखवली असली तरी तितकी झाडे खरोखरच लावण्यात येतील का, यातील किती झाडे जगतील, असे प्रश्नही पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात मेट्रो प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता हे प्रकरण न्यायालयात असल्याने कोणीही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
>3426 वृक्ष छाटणीचे प्रस्ताव सादर त्यानंतरही अशी झाली वृक्षांची छाटणी