मुंबई : मुलुंडमध्ये पीएमजीपी टॉवरच्या आय विंगमध्ये गुरुवारी लिफ्ट दुर्घटनेत संजय यादव यांचा मृत्यू झाला. लिफ्टच्या निकृष्ट कामामुळेच यादव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सोसायटीचे सचिव लक्ष्मण म्हसकर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, ते २०१६ पासून येथे राहतात. ३१ जानेवारीला इमारतीतील लिफ्टची साखळी तुटल्याने एक रहिवासी १६व्या मजल्यावरून खाली आला. त्यात तो थोडक्यात बचावला. याबाबत ओमेगा कंपनीकडे तक्रार करताच, आज येतो, उद्या येतो म्हणत त्यांनी कामाची टाळटाळ केली.
त्यानंतर लिफ्ट बोटीसारखी हलत असल्याची तक्रार केल्यानंतर सोमवारी ओमेगाचे कर्मचारी आले आणि काम करून गेले. मात्र तरीही लिफ्टमधील समस्या कायम असल्याने गुरुवारी सकाळी त्यांना याबाबत पुन्हा सांगितले. त्यानंतर काम करत असताना ही दुर्घटना घडली. मुळात हा त्यांच्या निकृष्ट कामाचा बळी आहे, असे म्हसकर यांनी सांगितले.
सुविधांचा अभाव...
चार वर्षांतच इमारतीची दुरवस्था झाली आहे. काही ना काही समस्यांना रोज तोंड देत आहोत. कुठे आग लागते तर कुठे लिफ्ट कोसळते. याबाबत विकासकाकडे जायचे तर तो ठेकेदाराकडे बोट दाखवतो, तर ठेकेदार विकासकाकडे. यात आमचे मरण होत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही रहिवासी ११ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरणार आहोत.- स्वप्नील साळवी, खजिनदार
भविष्याची चिंता
या कॉलनीत एकूण ८ विंग असून ८१४ खोल्या आहेत, तसेच ७८९ कुटुंबे वास्तव्यास आहेत. चार वर्षांतच इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे या इमारतीचे भविष्यात काय होणार, अशी भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.- विनय नलावडे, रहिवासी, आय विंग.