Join us  

वृद्ध ठरतायत एकटेपणाचे बळी

By admin | Published: July 07, 2016 3:16 AM

आयुष्याची संध्याकाळ आनंदात, सुखात जावी, यासाठी लोक आयुष्यभर झटतात. पै-पै जोडतात. पण, आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे वृद्धापकाळात विविध आजार जडू लागतात.

- पुजा दामले, मुंबई

आयुष्याची संध्याकाळ आनंदात, सुखात जावी, यासाठी लोक आयुष्यभर झटतात. पै-पै जोडतात. पण, आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे वृद्धापकाळात विविध आजार जडू लागतात. आजार जडल्याने वृद्धांच्या हालचालीवर अनेक निर्बंध येतात. आजाराने शरीराबरोबर मन पोखरत जाते. त्यात येणारा एकटेपणा आणि कुटुंबियांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे ज्येष्ठ नागरिक आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे समोर येत आहे. हे टाळण्यासाठी ज्येष्ठांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला सध्या डॉक्टर देत आहेत.मंगळवार, ५ जुलै रोजी मुलुंड येथील ६३ वर्षीय वृद्धाने मधुमेहाला कंटाळून तीन मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत आत्महत्या केली. भिकू गोविंद प्रभाकर असे या मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेनंतर पुन्हा ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे आजार हा विषय प्रकाश झोतात आला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये गेल्या काही वर्षांत एकाकीपणा कमालीचा वाढला आहे. कारण, शहरीभागातील मुले शिकण्यासाठी, नोकरीसाठी परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होतात. तर, ग्रामीण परिसरातील तरुण शहरात येऊन स्थायिक होतात. त्यामुळे घरांमध्ये एकट्या राहणाऱ्या वृद्धांचे प्रमाण वाढले आहे. वय वाढल्याने शरीर थकते त्याचबरोबर अवयवांची कार्यक्षमता ही कमी होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आजारपण वाढत जाते. ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, पचन न होणे, बद्धकोष्ठता हे त्रास प्रामुख्याने होत असल्याची माहिती केईएम रुग्णालयातील सोशल मेडिसीनच्या डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली.डॉ. भाटे यांनी सांगितले, की ज्येष्ठ नागरिकांना आजार जडल्यानंतर शारीरिक हालचालीवर मर्यादा येतात. त्यामुळे इतके वर्षे स्वत:च्या स्वत: गोष्टी करणारी व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून राहू लागते. याचा त्या व्यक्तींना अधिक त्रास होतो. आजारपणामुळे या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. त्यातच स्वावलंबनामुळे केले जाणाऱ्या दुर्लक्षाचा यांना अधिक त्रास व्हायला लागतो. तर, दुसरीकडे घरात राहून त्यांचा सामाजिक संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होऊ लागतो. त्यामुळेही त्यांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते. परिणामी, ज्येष्ठांच्या मनात भलते-सलते विचार येऊ लागतात. या विचारांच्या जाळ््यात ज्येष्ठ नागरिक अडकत जाऊन खाणे-पिणे कमी करतात. आधीच शरीराला आजार जडलेला असतो. त्यात खाणे-पिणे कमी केल्यामुळे त्यांचा आजार बळवण्याचा धोका अधिक असतो. आजारी ज्येष्ठ नागरिकांची काळजी केली पाहिजे. त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. फॅमिली फिजिशियन डॉ. अनिल पाचणेकर यांनी सांगितले, पुरुष आणि महिलांना होणारा त्रास हा वेगळा असतो. महिलांना रजोनिवृत्तीनंतर हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे महिलांचे दिसणे बदलू लागते. याचाही अनेक महिलांना मानसिक त्रास होतो. महिलांचा स्वभाव चिडचीडा होतो. त्यांना रात्री झोप लागत नाही, जास्त घाम येण्याचाही त्रास भेडसावतो. तर, पुरुषांमध्येही बदल होतात. पण, हे बदल पुरुष महिलांपेक्षा अधिक लवकर स्वीकारतात. या बदलांमुळे पुरुषांना मानसिक ताण कमी होतो. पण, अन्य शारीरिक व्याधींमुळे पुरुषही अनेकदा परावलंबी होतात. ज्येष्ठ नागरिकांना परिस्थितीचा ताण अधिक येतो. त्यातून हृदयविकारासारखे आजारही जडू शकतात. ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य हा नाजूक विषय आहे.आणखीन किती?वडाळ्यातील घटना११ फेब्रुवारी २०१६ : आजारामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या ७० वर्षीय वृद्धाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना वडाळा येथे घडली. हरिओम कुंभार असे मृत वृद्धाचे नाव होते. वडाळा येथील डॉ.आंबेडकर नगर परिसरात कुंभार मुलासोबत राहत होते. त्याच परिसरात त्यांचे सलूनचे दुकान आहे. धोतराने गळफास६ एप्रिल २०१५ : आजाराला कंटाळून ६८ वर्षीय गोविंद खंडू भवार यांनी राहत्या घरात धोतराने गळफास घेत आत्महत्या केली. मुलुंड पश्चिमेकडील भीमवाडी परिसरात भवार कुटुंबियांसमवेत राहण्यास होते. वृद्धापकाळात जडलेल्या विविध आजाराला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली.वृद्धेची आत्महत्या२५ एप्रिल २०१५ : पतीच्या आजारपणामुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या ६२ वर्षीय वृद्धेने आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. रमाबेन मुलजी कतिरा असे वृद्धेचे नाव असून त्यांनी राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेतली.मुलुंड पूर्वेतील घटना२४ सप्टेंबर २०१५ : मुलुंड पूर्वेकडील संत रामदास रोड येथील जय पुष्प मिलन सोसायटीत ८० वर्षीय रमाकांत सदाशिव गोखले पत्नी सोबत राहत होते. ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. या आजाराला कंटाळून २४ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. गोखले यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे नमूद केले होते. ज्येष्ठ नागरिकांनी काय करावे?- आजार स्वीकारा पण डगमगून जाऊ नका- परावलंबी झालो म्हणजे अस्तित्व संपले ही भावना मनात आणू नका- जेवणाच्या, झोपेच्या वेळा पाळा - स्वत:ला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा