मुंबई : उच्चभ्रू घरातील स्थळ आल्याने भावाने थाटात बहिणीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर महिनाभरातच बहीण पतीसोबत अमेरिकेला निघून गेली. मात्र, तेथे काही दिवसांतच पैसे, दागिन्यांसाठी तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप करत भावाने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.अंधेरीचे रहिवासी असलेले तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या बहिणीचा २५ फेब्रुवारी रोजी मुलुंडचे रहिवासी असलेल्या भूपिंदरसिंग चड्डा याच्यासोबत विवाह झाला. त्यानंतर ती कुटुंबीयांसोबत मुलुंडमध्ये राहू लागली. १० मार्च रोजीचड्डा नोकरीसाठी अमेरिकेला निघून गेला. त्यापाठोपाठ तक्रारदार यांची बहीणदेखील अमेरिकेत राहायला गेली. काही दिवसांनंतरचड्डा हा एका आजाराने त्रस्त असून त्यासाठी त्याला औषधे घ्यावी लागत असल्याचे तक्रारदाराला बहिणीकडून समजले. शिवायचड्डाने पत्नीचा पैसे आणि दागिन्यांसाठी छळ सुरू केला. ही बाब समजताच तक्रारदार यांना धक्का बसला.३१ आॅगस्ट रोजी चड्डा आणि तक्रारदार यांच्या बहिणीच्या व्हिसाची मुदत संपली. चड्डाने स्वत:च्या व्हिसाचे नूतनीकरण करून घेतले. मात्र, कंपनीस सांगून पत्नीच्या व्हिसाचे नूतनीकरण होऊ दिले नाही. त्यामुळे तिचे तेथे राहणे बेकायदेशीर ठरले. त्यानंतर चड्डाने पत्नीला शिवीगाळ करून धमकी देत घरातून बाहेर काढले, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.५ सप्टेंबरपासून चड्डाची पत्नी तेथेच शेल्टर होममध्ये राहत आहे. शेल्टर होमच्या माध्यमातून तिच्या व्हिसाचे नूतनीकरण करण्याची कार्यवाही सुरू असून व्हिसाचे नूतनीकरण होताच ती मुंबईत येणार आहे. त्यापूर्वी तिने २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग, वांद्रे येथे वरील घटनाक्रमाला ई-मेलद्वारे वाचा फोडली. त्यानुसार, तिच्या व्यावसायिक भावाने सोमवारी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हादाखल केला असून ते अधिक तपास करीत आहेत.
लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:48 PM