नुकसानग्रस्तांना मिळणार १६ कोटी
By admin | Published: April 7, 2015 05:10 AM2015-04-07T05:10:14+5:302015-04-07T05:10:14+5:30
रायगड जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ४३ हजार ६१३ शेतकऱ्यांच्या १७ हजार २३७ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १६ कोटी ४६ लाख रुपयांची मदत मिळणे अपेक्षित असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने अहवालात नमूद केले आहे. तो अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनामार्फत सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. हातचे पीक जाणार या भीतीने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला होता. राज्यभर पावसाने हाहाकार केला होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी सरकारला केली होती. त्यानंतर अवकाळी पावसाचा ज्या जिल्ह्यांना तडाखा बसला आहे तेथील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला केले होते. त्याची दखल घेत कृषी विभागाने पंचनामे पूर्ण केले असून त्याबाबतच्या अंतिम अहवालावर अद्याप स्वाक्षरी होणे बाकी आहे.
५० टक्क्यांच्यावर ज्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना सरकारी निर्णयाप्रमाणे प्रतिहेक्टरी चार हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. सरकारला यामध्ये वाढ करावयाची असल्यास तो सरकारचा निर्णय आहे, असेही सूत्रांनी सांगितले.