विधानसभेत दुप्पट जागा जिंकणार!, आदित्य ठाकरेंची गर्जना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:27 AM2018-03-30T06:27:14+5:302018-03-30T06:27:14+5:30
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आता असलेल्या जागांहून दुप्पट जागा जिंकू,
मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवा सेनेचे सर्व १० उमेदवार निवडून आल्याने शिवसैनिकांनी दादरमध्ये गुरुवारी जल्लोष केला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आता असलेल्या जागांहून दुप्पट जागा जिंकू, अशी गर्जना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे जल्लोष करताना केली.
माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, अधिसभेच्या दहा जागांवर युवा सेनेने एकहाती विजय मिळवला आहे. शिवसेना किती मोठा विजय मिळवू शकते, हे या निवडणुकीतून आम्ही दाखवले आहे. त्यामुळे विधानसभेतही आतापेक्षा दुप्पट जागा मिळतील, असा विश्वास आहे. पुढचे लक्ष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. हा गुलाल तुम्हाला २०१९ मध्येही दिसेल. सत्ता देण्याचे आवाहन करताना आदित्य यांनी, केलेल्या कामाच्या जोरावर हा भगवा वॉश दिल्याचेही सांगितले. काहींनी छुपी युती केली होती. मात्र मतदारांनी शिवसेनेवरच विश्वास दाखवल्याचे म्हणत, आदित्य यांनी भाजपा आणि मनविसे यांना चिमटा काढला.
नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या दहा जागांसाठी एकूण ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २५ मार्च रोजी ५३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. या १० जागांच्या निकालासाठी २७ मार्च पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. बुधवारी राखीव प्रवर्गातील, तर गुरुवारी खुल्या प्रवर्गातील जागांचे निकाल जाहीर झाले.
हे ठरले विजयाचे शिल्पकार
खुल्या प्रवर्गातून युवा सेनेचे महादेव जगताप, प्रदीप सावंत, प्रवीण पाटकर, सुप्रिया करंडे आणि मिलिंद साटम हे उमेदवार विजयी झाले. तर राखीव प्रवर्गातील निवडणुकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गात युवा सेनेचे निखिल जाधव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज (डीटी/एनटी) प्रवर्गात शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गात राजन कोळंबेकर आणि महिला प्रवर्गात शीतल शेठ देवरुखकर हे युवा सेनेचे उमेदवार निवडून आले.
युवा सेनेच्या विजयात राजकीय हस्तक्षेप
राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी युवासेनेने शिवसेनेची मदत घेतल्याचा आरोप निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. युवा सेनेचे राजकीय महत्त्व वाढविण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. शिक्षणातील प्रश्न घेऊन अभाविप विद्यार्थ्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचली होती. राजकीय मदतीशिवाय अभाविपचे राज्यातील मुंबई वगळता इतर नऊ विद्यापीठांत पदवीधर वर्गात तब्बल ५० सदस्य निवडून आल्याचेही अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले.
अभाविप, मनविसेचा धुव्वा
अधिसभेच्या एकूण १० जागांपैकी एकाही जागेवर अभाविप किंवा मनविसे पुरस्कृत उमेदवारांना विजय मिळवता आला नाही. याउलट युवा सेनेचे उमेदवार ज्या फरकाने निवडणूक जिंकले आहेत, तो फरक पाहता दोन्ही संघटनांचा या निवडणुकीत धुव्वा उडाल्याचे दिसते.