नवी मुंबई : निवडणुकीच्या निकालादरम्यान निवडणूक अधिकाऱ्याकडून घडलेल्या हलगर्जीमुळे विजयी उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. विजयी उमेदवारांच्या प्रमाणपत्रांवर या अधिकाऱ्याने शिक्काच न मारल्याने हा गोंधळ झाला. प्रमाणपत्र कोकण आयुक्तांकडे सादर करण्यासाठी शनिवारी विजयी उमेदवारांनी गर्दी केली असता हा प्रकार उघड झाला.महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या काही उमेदवारांच्या पात्रतेबाबत शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यांच्याकडील प्रमाणपत्रांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा शिक्का (स्टँप) नसल्याने कोकण आयुक्तालयाचा त्यावर आक्षेप घेतला. विजयी उमेदवारांना शनिवारी आपली मूळ प्रमाणपत्रे कोकण आयुक्तांकडे सादर करायची होती. त्यानुसार सर्वच विजयी उमेदवारांनी सीबीडी येथील कोकण भवनमध्ये गर्दी केली होती. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांच्या आक्षेपामुळे नेरुळ विभागातील विजयी उमेदवारांना चांगलाच घाम फुटला. त्यांच्या प्रमाणपत्रांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा शिक्का नसल्याने ही प्रमाणपत्रे जमा करून घेतली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निकालात विजयी होऊनही आपण अपात्र ठरतोय की काय अशी चिंता या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये दिसली. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लागताच या नगरसेवकांनी नेरुळ कार्यालयात धाव घेतली. परंतु निवडणुकीच्या कामकाजानंतर अनेक अधिकारी सुट्टीवर असल्याने तिथेही त्यांची निराशाच झाली. निवडणूक निर्णय अधिकारी जागेवर नसल्याने संतप्त झालेल्यांनी अखेर आयुक्त, उपआयुक्त यांचे फोन खणखावले. यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार विभाग कार्यालयात उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रावर वैधतेचा शिक्कामोर्तब केला. त्यामुळे जिवात जीव आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पुन्हा कोकण भवन कार्यालयाची वाट धरली. मात्र घडलेल्या या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निकाल जाहीर करतानाच विजयी उमेदवारांना दिलेल्या प्रमाणपत्रांवर अधिकाऱ्याचा शिक्का मारणे आवश्यक होते. परंतु कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे अनेक प्रमाणपत्रांवर मोहर न लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागल्याचा संताप सानपाडा येथील नवनिर्वाचित नगरसेविका ऋ चा पाटील यांनी व्यक्त केला आहे. नेरुळ विभागात झालेल्या मतमोजणी केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून हा प्रकार झाला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणपत्र देण्यात आलेल्या विजयी उमेदवारांनाच या त्रासाला सामोरे जावे लागले. (प्रतिनिधी)
विजयी उमेदवारांना फटका
By admin | Published: May 03, 2015 5:35 AM