भारताचा प्यूर्टो रिकोवर दणदणीत विजय
By Admin | Published: September 3, 2016 11:31 PM2016-09-03T23:31:52+5:302016-09-03T23:31:52+5:30
हुकमी खेळाडू सुनिल छेत्रीसह नारायण दास, जेजे लालपेखलुआ आणि जॅकीचंद या सर्वच प्रमुख खेळाडूंनी केलेल्या चमकदार खेळाच्या जोरावर भारताने शनिवारी मुंबईत
- रोहित नाईक
मुंबई, दि.03 - हुकमी खेळाडू सुनिल छेत्रीसह नारायण दास, जेजे लालपेखलुआ आणि जॅकीचंद या सर्वच प्रमुख खेळाडूंनी केलेल्या चमकदार खेळाच्या जोरावर भारताने शनिवारी मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यात प्यूर्टो रिको संघाला ४-१ असे लोळवले. विशेष म्हणजे फीफा क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या भारताने या सामन्यात जबरदस्त वर्चस्व राखताना आपल्याहून सरस क्रमवारी असलेल्या प्यूर्टो रिकोला धूळ चारली.
सावध सुरुवात केल्यानंतर प्यूर्टो रिकोच्या आक्रमणापुढे दबावाखाली आलेला यजमान संघ ७व्याच मिनिटाला ०-१ असा पिछाडीवर पडला. मात्र, यानंतर भारतीयांनी मागे पाहिले नाही. मोक्याच्यावेळी आपला वेग वाढवताना भारतीयांनी गोलांचा चौकार लगावत विजय मिळवला.
प्यूर्टो रिकोला इम्यान्यूएल सँचेझने पेनल्टी किकवर यशस्वी गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर नारायण दास (१७ मिनिट), सुनिल छेत्री (२४ मिनिट) आणि जेजे (३४ मिनिट) यांनी केलेल्या महत्त्वपुर्ण गोलच्या जोरावर भारताने मध्यंतराला ३-१ अशी भक्कम आघाडी राखली.
विश्रांतीनंतरही भारतीयांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. यावेळी भारताने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करुन पाहुण्या संघाला दडपणाखाली ठेवले. त्यात, जॅकीचंदने (५८ मिनिट) गोल करुन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर प्यूर्टो रिकोने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्नही सोडले. पाहुण्या संघाकडून सँचेझने एकमेव गोल केला.
मुंबईतील शहाजी राजे क्रीडा संकुलातील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्याच्या निमित्ताने तब्बल ६१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्याचा आनंद घेता आला. तब्बल ६ हजार ८९४ फुटबॉलप्रेमींनी यावेळी उपस्थिती दर्शविताना भारतीय संघाला तुफान पाठिंबा दिला.
गणपती बप्पाच्या जयघोषात फुटबॉलप्रेमींनी स्टेडियम दणाणून सोडले. यावेळी त्यांनी वंदे मातरम् गाताना भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. तसेच, सामना संपल्यानंतर प्यूर्टो रिको संघाचाही जयघोष करीत भारतीय पाठिराख्यांनी खिलाडूवृत्ती दाखवली.