मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशानंतर पुन्हा एकदा ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ (ईव्हीएम)चा मुद्दा चर्चेला आला आहे. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत भाजपाने मिळविलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर हा मतदान यंत्राचा विजय असल्याची खोचक प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.कर्नाटक निवडणुकांच्या मतमोजणीत सुरुवातीला भाजपा आणि कॉँग्रेसमध्ये फारसे अंतर नव्हते. दोन्ही पक्षांमध्ये कांटे की टक्कर होईल असे चित्र होते. मात्र, १०नंतर चित्र बदलत गेले आणि १२ वाजण्याच्या सुमारास भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करेल असे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर ईव्हीएममधील कथित गडबडीची चर्चा सुरू झाली. मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून भाजपा निवडणुका जिंकते, असा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून अनेकदा केला जातो. राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून याच आरोपाचा पुनरुच्चार केला. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा विजय असो, असे ट्विट करत राज यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे.राज यांच्या ट्विटवर लागलीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. अनेकांनी राज यांच्या भूमिकेवर टीका करत मनसेची खिल्ली उडवली. ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरली तरी मनसेची स्थिती सुधारणार नसल्याचे प्रत्युत्तर काही नेटीझन्सनी दिले.
मतदान यंत्रांचा विजय - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:24 AM