बोरीवलीत रंगणार विजय प्रस्थान उत्सव! या महोत्सवात १६ तरुण दीक्षा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 06:03 AM2018-01-12T06:03:49+5:302018-01-12T06:03:54+5:30
बोरीवली येथील प्रमोद महाजन मैदानात १९ जानेवारीपासून विजय प्रस्थान उत्सव हा ऐतिहासिक कार्यक्रम रंगणार आहे. जैन आचार्य श्री युगभूषण सूरीजी (पंडित महाराज साहेब) यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनाखाली हा महोत्सव पार पडणार आहे.
मुंबई : बोरीवली येथील प्रमोद महाजन मैदानात १९ जानेवारीपासून विजय प्रस्थान उत्सव हा ऐतिहासिक कार्यक्रम रंगणार आहे. जैन आचार्य श्री युगभूषण सूरीजी (पंडित महाराज साहेब) यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनाखाली हा महोत्सव पार पडणार आहे.
या महोत्सवात १६ तरुण व सुशिक्षित व्यक्ती ऐहिक सुखाचा त्याग करून विजयाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी जैन दीक्षा घेणार आहेत. १९ जानेवारीला १००हून अधिक साधू व साध्वींसह दीक्षार्थ्यांच्या साक्षीने भव्य पदयात्रेतून पंडित महाराज साहेब कार्यक्रमस्थळी आगमन करणार आहेत. २० जानेवारीला सायंकाळी होणा-या ‘विदाय समारोह’ कार्यक्रमात हे १६ मार्गस्थ दीक्षार्थी शपथ घेतील. रविवारी, २१ जानेवारीला सायंकाळी चित्रपटातील कलाकार ‘एक मजाये की लाईफ’ हे पथनाट्य सादर करणार आहेत. २२ जानेवारीला पहाटे ५.३० वाजता दीक्षा समारंभ पार पडेल.
या १६ दीक्षार्थी व्यक्तींमध्ये विविध पार्श्वभूमीतील तरुणांचा समावेश आहे. त्यात संकेत पारेख (२९) हा तरुण मूळचा जैन धर्मीय नसून त्याने आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंगमधून बी.टेक.ची पदवी घेतली आहे. संकेतप्रमाणेच प्रीतेश लोडाया (३९) व त्यांची पत्नी हेमल आणि मुलगी याशिका लोडाया, मीता देढिया (४२) व त्यांचा मुलगा धर्मिल, द्रष्टी देढिया (२०) अशा विविध तरुणांचा समावेश दीक्षार्थींमध्ये आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ज्योत इंडिया या संस्थेने केले असून कल्याण मित्र परिवार (केएमपी) यांचे साहाय्य लाभणार आहे. या कार्यक्रमास गीतार्थ गंगा, विजय प्रस्थान उत्सव समिती मुंबईने अनेक मान्यवरांना आमंत्रण दिले आहे. देशातून तब्बल ७५ हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.