विदर्भ मराठवाडा गारठला; मुंबईतही थंडीची चाहूल लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:07 AM2020-12-06T04:07:07+5:302020-12-06T04:07:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरातील बुरेवी चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले असून ते सध्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बंगालच्या उपसागरातील बुरेवी चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले असून ते सध्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या जवळ आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर आता कमी होऊ लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात थंडीचे पुनरागमन होऊ लागले आहे. विदर्भातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी, दक्षिण केरळमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारीही तामिळनाडु, पाँडेचरी, दक्षिण केरळ, लक्ष्यद्वीप येथील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात आता उत्तरेकडील वार्यांचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातील अनेक भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घसरले आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणच्या किमान तापमानात किंचित घट झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ११.५, लोहगाव १३.२, जळगाव १२.६, कोल्हापूर १७.७, महाबळेश्वर १४.३, मालेगाव १३.६, नाशिक ११.१, सांगली १६, सातारा १३.३, सोलापूर १४.४, मुंबई २१.४, सांताक्रुझ १८.४, रत्नागिरी २०.६, पणजी २२.७, डहाणु १८.८, औरंगाबाद १३, परभणी १०.६, नांदेड १४, अकोला १३.१, अमरावती १४.४, बुलढाणा १४.२, चंद्रपूर १६, गोंदिया १०.५, नागपूर १२.४, वाशिम १२.८, वर्धा १३.४.